तप्त उन्हाने घायाळ झालेल्या कोल्हापूर जिल्ह्याला शनिवारी सायंकाळी आलेल्या पावसाने हलक्या गारव्याचा दिलासा दिला. आजरा तालुक्यात गारपीट झाली. जिल्ह्याच्या अनेक भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पावसाला सुरुवात होताच अनेक ठिकाणी वीज गायब झाली.
गेले दोन दिवस जिल्ह्यात उष्मा लहर आहे. ४२ अंशापर्यंत पारा चढला होता. दुपारच्या वेळी तर बाहेर पडणेही मुश्कील झाले होते. सायंकाळी जोरदार वारे वाहू लागले, वीज चमकू लागल्या. पाठोपाठ पावसाने हजेरी लावली.
आजरा तालुक्यात आजरा शहरासह परिसारातील गावामध्ये वारा व गारांचा मोठा पाऊस पडला दुपारी चार वाजण्याच्या दरम्यान जोराचा वारा वाहू लागला. गारांचा जोरदार वर्षाव झाला. त्याचा फटका आंबा पिकाला बसला असल्याचे सांगण्यात येते.आजरा गडहिग्लज रोडवर रत्यावर दोन ठिकाणी झाडे पडली. काही काळ वहातुक ठप्प झाली होती. आजरा शहरात अनेक घरावरचे पत्रे, कौल उडुन गेली. तर शहरात प्रमुख रत्यावर पाणीच – पाणी झाले होते. संभाजी चौक येथे शहरातुन येणारे पाणी साचले होते.
हातकणंगले- शिरोळ तालुक्यात रात्री पावसाने हजेरी लावली. गेल्या चार – पाच दिवस प्रंचड उन्हाचा तडाका आणि कमालीचा उष्मा यातून काहीशी सुटका झाली. शेतकरी वर्गाला या पावसाचा शेती मशागतीसाठी फायदा होणार आहे.