कोल्हापूर लोकसभेसाठी काँग्रेसने शाहू महाराज छत्रपती यांची उमेदवारी जाहीर केल्यानंतर आज शाहू महाराज यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध विषयांवर भाष्य केले. “आपल्या महाराष्ट्राला, कोल्हापूरला मोठा इतिहास आहे. शककर्ते शिवाजी महाराज यांच्यापासून आपला इतिहास सुरू होता. महाराजांनी अन्यायाविरुद्ध दिलेला लढा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर आधुनिक भारतात छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण, सामाजिक आणि समतेच्या क्षेत्रात महत्त्वाचे कार्य केले. शाहू महाराज, फुळे आणि आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव माझ्यावर आहे. या महापुरुषांचे विचार मी पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहे”, अशी भूमिका काँग्रेस पक्षाचे कोल्हापूर लोकसभेचे उमेदवार शाहू महाराज यांनी व्यक्त केली.
शाहू महाराज पुढे म्हणाले, “मी राजकारणात प्रत्यक्षात नव्हतो. मात्र राजकारणाच्या आजूबाजूला सीमेवर मी असायचो. तेव्हा मला राजकारणात उतरण्याची आवश्यकता वाटली नव्हती. पण आता कदाचित जनतेला वाटल असेल की, हीच वेळ आहे महाराजांनी राजकारणात लक्ष घालायला हवं. म्हणून जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीसाठी उभा राहिलो आहे.”
पुरोगामी विचारांच्या लोकांनी, पक्षांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. त्यांनी एकटे-एकटे लढून यश मिळणार नाही. त्यामुळेच महाराष्ट्रात महाविकास आघाडीची निर्मिती झाली आहे. त्यात अनेक पक्ष सहभागी झाले आहेत. काँग्रेस पक्षाने मला उमेदवारी दिली असली तरी उद्धव ठाकरे यांनी मला पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेस हा जुना पक्ष आहे, स्वातंत्र्यपूर्व काळात या पक्षाचे योगदान आहे. आता लोक म्हणतात काँग्रेसने काहीच केले नाही. पण काँग्रेसने अनेक कामे केली आहेत, काँग्रेसने ७५ वर्षांत एक पाया रचल्यामुळेच आता पुढे विकास काम करता येत आहे.
हिंदुत्ववादावर शाहू महाराजांची प्रतिक्रिया
मविआबरोबर जाऊन तुम्ही हिंदुत्ववाद सोडला आहे का? असा प्रश्न यावेळी पत्रकारांनी विचारला असता शाहू महाराज म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या लोकांना संरक्षण दिले, त्यांच्यावर अन्याय होऊ न देणे यासाठी प्रयत्न केला. हाच आपला हिंदुत्ववाद आहे. भारतातील सर्व लोकांना संरक्षण देणे, त्यांच्यात समतेचा विचार रुजवणे आणि सर्वांना एकत्र घेऊन देशाचा विकास करणे, हाच आपला हिंदुत्ववाद आहे.”
मोदींच्या कार्याला कमी लेखता येणार नाही
पंतप्रधान मोदी यांच्याबाबत बोलत असताना शाहू महाराज म्हणाले की, मोदी हे १० वर्षपासून पंतप्रधान आहेतच, त्यांच्या विकासाच्या कार्याला कमी लेखता येणार नाही. पण समाजाला, राजकारणाला जी दिशा दिली पाहीजे, ती दिशा दिली असती तर काहीच प्रश्न उपस्थित झाला नसता. ही दिशा सुधारण्यासाठीच मविआतील मित्रपक्ष एकत्र येऊन काम करत आहेत.
कोल्हापूर हा महाराष्ट्रातला प्रमुख विभाग आहे. पण कोल्हापुरातून आतापर्यंत दमदार नेतृत्व तयार झालेले नाही. भविष्यात राज्याचे राजकारण योग्य दिशेने न्यायचे असेल महाविकास आघाडीने नेतृत्व देणे गरजेचे आहे. कोल्हापूर हे नेतृत्व देईल, अशी अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही, असेही शाहू महाराज छत्रपती म्हणाले.
पक्षांतर बंदी कायदा कुचकामी ठरल्यामुळं महाराष्ट्र अस्थिर
शाहू महाराज यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काही लोकांकडून ‘मान गादीला, पण मत मोदीला’, असा प्रचार करत आहेत. त्यावर प्रतिक्रिया देताना शाहू महाराज म्हणाले की, राजकारणात उतरलो तर टीका होणारच. पण टीकेला उत्तर न देता मी काम करत राहील. आज महाराष्ट्राची परिस्थिती पहिली तर गेल्या ६० वर्षात एवढा अस्थिर महाराष्ट्र मी पाहिला नव्हता. पक्षांतर बंदी कायदा अपयशी झाल्यामुळे महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. पक्षांतर बंदी कायदा पाळण्याऐवजी त्यातून पळवाटा शोधल्या जात आहेत. या कायद्याचा दुरुपयोग कसा करता येईल, याचा प्रयत्न होताना दिसत आहे. हा कायदा एकतर काढून टाकावा किंवा तो मजबूत करावा. एखाद्या पक्षाचा निकाल द्यायला दीड वर्षांचा कालावधी घेता कामा नये, अशीही भूमिका शाहू महाराज यांनी मांडली.