कोल्हापूरमध्ये एसटी बस चालवत असताना चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटल्याने विचित्र अपघात झाला. बस उमा टॉकीज परिसरातील गाड्यांना धडकली असून या अपघातात दोन जण ठार झाले. या घटनेत सात जण जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
एसटी चालक रमेश कांबळे हे बुधवारी हुपरीहून बस घेऊन कोल्हापूरला निघाले होते. संध्याकाळी बस कोल्हापूरमधील उमा टॉकीज परिसरात आली. यादरम्यान कांबळे यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे बसवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर बस रस्त्यावरील सात दुचाकी, तीन चारचाकी आणि एका रिक्षेला धडकली. या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला. देवास भोसरवाडे (वय ५०) आणि सुहास पाटील (वय २२) अशी या दोघांची नावे आहेत. अपघातात जखमी झालेले सात जण आणि एसटी चालक कांबळे यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या घटनेमुळे उमा चौक परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती.