वाडी रत्नागिरी येथील जोतीबा मंदिराचे चारही दरवाजे भाविकांसाठी खुले करावेत, ई -पास पद्धत बंद करावी या मागणीसाठी ग्रामस्थांनी आज (शुक्रवार) गाव बंद ठेवले.
दख्खनचा राजा जोतिबा हे राज्यातील प्रसिद्ध देवस्थान आहे. जोतिबा देवाचे खेटे सुरू असल्याने भाविकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे गावातील गुरव समाजाने ई पास बंद करून चारही दरवाजे सुरू करावेत, अशी मागणी जिल्हाधिकार्यांकडे केली होती.
याबाबत निर्णय न झाल्याने आज(शुक्रवार) सकाळपासून गावातील दुकाने बंद राहिली. व्यापारी, विक्रेते, गुरव समाज, मानकरी, ग्रामस्थ, महिला यांनी गाव बंद ठेवून मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरच ठिय्या आंदोलन केले. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा इशारा देण्यात आला.
प्रशासनाची भूमिका
ई – पास ही सुविधा करोना नियमावलीचा भाग म्हणून नव्हे तर भक्तांना कमी काळात देवदर्शन व्हावे यासाठी तिरुपतीच्या धर्तीवर सुरू केली आहे. यामुळे भाविकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया आहेत. मंदिराचे चारही दरवाजे उघडण्यास होकार दर्शवला आहे. तर ई पास मिळण्यास वेळ जात असल्याची तक्रार दूर होण्यासाठी दुप्पट कर्मचारी कार्यरत केले जातील असे आश्वस्त केले आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे सचिव शिवराज नायकवडी यांनी दिली.