डॉ.नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक ऱ्यांना २० सप्टेंबपर्यंत पोलिसांनी पकडले नाही, तर विवेकवादी कार्यकर्ते गप्प बसणार नाहीत. ते शांततामय मार्गाने इतका आक्रोश करतील की संपूर्ण देश ढवळून निघेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी शनिवारी येथे बोलताना केले.
आणखी पाच दिवसांनी दाभोलकरांच्या खुनाला महिन्याचा कालावधी पूर्ण होणार आहे. महिनाभरात मारेक ऱ्यांना पकडले न गेल्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी पदाचे राजीनामे द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.येथील केशवराव भोसले नाटय़गृहामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘विवेक निर्धार’ परिषद आयोजित केली होती. या वेळी वागळे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. वागळे व परिषदेचे अध्यक्ष कॉ.गोविंदराव पानसरे यांच्या उपस्थितीवरून हिंदुत्ववादी संघटनांनी या परिषदेला जोरदार विरोध दर्शविला होता. या पाश्र्वभूमीवर ती कशी पार पडते याकडे लक्ष वेधले होते. परिषदेवरून निर्माण झालेली तणावाची परिस्थिती निर्माण होऊन नाटय़गृह परिसरात प्रचंड पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. परिषदेला राज्यभरातील पुरोगामी कार्यकर्त्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. नाटय़गृह खचाखच भरल्याने बाहेर उभारून अनेकांनी भाषणे ऐकणे पसंत केले.     
जादूटोणाविरोधी विधेयक आणण्यासाठी लढणाऱ्या डॉ.दाभोलकरांचा खून म्हणजे विवेकवादाचा खून आहे. या प्रवृत्तीला गाडण्यासाठी ‘विवेक निर्धार’ परिषदेतून असंख्य कार्यकर्ते तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त करून वागळे म्हणाले, इतर ठिकाणी सभा झाल्यावर गाजतात. पण कोल्हापुरात सभा होण्यापूर्वीच गाजते. राजर्षी शाहू महाराजांचा पुरोगामी विचारांचा वारसा असतानाही येथे सभेला विरोध होईल, असे वाटले नव्हते. येथील शिवसेनेच्या आमदारांनी विरोधासाठी पुढाकार घेणे हे दुर्दैवी आहे. ते ज्या पक्षाचे आमदार आहेत त्या पक्षाचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे होते याची जाणीव त्यांनी ठेवावी. विनोबा भावे यांनी ‘जो हिंसेपासून दूर राहतो, तो हिंदू’ अशी सोपी व्याख्या केली असताना दाभोलकरांचा खून होतो असे असेल तर हिंदू नेमके कोणाला म्हणायचे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.     
ज्येष्ठ नेते प्रा.डॉ.एन.डी.पाटील म्हणाले, राज्यात होत असलेल्या अनर्थकारी घटनांमुळे पुरोगामी परंपरेचा समृद्ध वारसा हरवत चालला आहे.
राज्यकर्त्यांच्या निष्क्रियतेमुळे दाभोलकरांसारखा लाख मोलाचा कार्यकर्ता गमाविला आहे. आपल्यामध्ये दाभोलकर नसले, तरी त्यांच्या विचाराच्या आधारे राज्यात विवेकाची ज्योत पेटविली जावी, हा या ‘विवेक निर्धार’ परिषदेचा उद्देश आहे.
अध्यक्षीय भाषणात कॉ.पानसरे म्हणाले, डॉ.दाभोलकर यांच्या विचारांना यश येत चालल्याने त्यांच्याभोवती माणसे जमत होती. आपल्या माणसाचे महत्त्व जितके आपणाला कळत नाही, त्याहून अधिक ते शत्रूला कळत असते. डॉ.दाभोलकर यांच्या विचाराचा प्रसार होत राहिला, तर आपली धडगत नाही असे वाटत राहणाऱ्या प्रवृत्तींनी त्यांचा खून केला. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्यांमध्ये बॅरिस्टर सावरकर आरोपी होते. ते त्यातून निर्दोष सुटले होते. पण ते आरोपी असल्याचा इतिहास जाणीवपूर्वक लपविला जात आहे. या वेळी दिलीप पवार, प्रा.सुभाष जाधव, शिवाजीराव परुळेकर, मेघा पानसरे, शरच्चंद्र कांबळे आदींची भाषणे झाली. स्वाती क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन तर सुजाता रसाळ यांनी आभार मानले. माजी आमदार संपतराव पवार, चंद्रकांत यादव, अतुल दिघे, प्रा.टी.एस.पाटील, के.डी.खुर्द, सुनील स्वामी आदी उपस्थित होते.

Story img Loader