लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील सत्ताधारी व विरोधी पक्षाच्या उमेदवारांना अपक्ष उमेदवार, उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. जी. कोळसे पाटील सोमवारपासून सात दिवस रोज एक प्रश्न पत्र पाठवून विचारणार आहेत. या प्रश्नावर राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष व आम आदमी पार्टीच्या उमेदवारांनी त्यावर स्पष्टीकरण द्यावे, असे जाहीर आव्हान त्यांनी केले आहे. हे प्रश्न गरिबी, शिक्षण, आरोग्य, अन्नधान्य, शेती यासंबंधी असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
पत्रकारांशी बोलताना कोळसे पाटील यांनी ही माहिती दिली. जनशक्तीच्या माध्यमातून लढतीतील उमेदवारांना उत्तरे देण्यास भाग पाडू, असा दावा त्यांनी केला. परकीय पैशाच्या मदतीबद्दल स्पष्टीकरण न देणारा ‘आप’ हा याबाबत काँग्रेस व भाजपचा ‘बाप’ आहे, ‘आप’ला परदेशातून मिळणारी मदत घातक आहे, मदत करणाऱ्यांना आपल्या देशात अराजक निर्माण करायचे आहे, आपचा या मातीतील माणसांशी संबंधच काय, अशी टीका त्यांनी केली.
आपल्या उमेदवारीमागे माजी खासदार बाळासाहेब विखे आहेत, असा प्रश्न कोळसे यांना केला असता तो त्यांनी फेटाळला. आपला राजकारणात कोणी गुरू नाही, असे ते म्हणाले. आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत असे सांगत संसदेत जाणारे, गेलेले तेथे जाताच भांडवलदारांची गुलामी पत्करतात, असा आरोप करताना कोळसे पाटील यांनी पायंडा मोडणारा, मानसिकतेला छेद देणारा खासदार म्हणून आपल्याला काम करायचे आहे, असा दावा केला.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आपण सर्वात श्रीमंत उमेदवार ठरल्याचा प्रसिद्धिमाध्यमांनी उल्लेख केला. त्यामुळे अनेकांचा आपल्याबाबत गैरसमज झाला, परंतु गेली ४० वर्षे आपण नियमित प्राप्तिकर भरतो आहे. आपली वकिली चांगली चालली, त्या काळात वरिष्ठ वकिलांच्या सल्ल्यानुसार सोने व जमिनीत गुंतवणूक केली. त्याचा आता फायदा होत आहे. संत गाडगेबाबांच्या प्रेरणेने आपण न्यायमूर्तीपदाचा राजीनामा दिला. त्याच प्रेरणेने काम करत आहोत. गेली २० वर्षे महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत, कामगार संघटना चालवतो आहोत, परंतु कधीच कोणाकडून वर्गणी जमा केली नाही, स्वखर्चाने गरिबांची आंदोलने चालवली. कोणत्याही उमेदवाराबरोबर आपण मालमत्ता हस्तांतरित करण्यास तयार आहोत, असे कोळसे म्हणाले.
अनेक उमेदवारांनी समाजसेवा, शेती असा व्यवसाय सांगितला. या व्यवसायातून संपत्ती जमा होते का? परंतु आपण कधी काही लपवले नाही, खोटे प्रतिज्ञापत्र सादर केले नाही, हा आपला गुन्हा ठरतो का, असा प्रश्न त्यांनी केला. या वेळी राजेंद्र निंबाळकर, साईनाथ पाटील आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा