नेदरलँडचे आघाडीचे फुलबॉलपटू रॉन व्लार यांनी बुधवारी पालम तालुक्यातील कोळवाडी येथील जि. प. प्राथमिक शाळेस भेट दिली. या भेटीत रॉन यांनी कोळवाडीत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती घेतली.
गेल्या दोन दिवसांपासून रॉन परभणी जिल्ह्यात आहेत. जिल्हाधिकारी राहुल रंजन माहिवाल बुधवारी त्यांच्यासमवेत होते. कोळवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीने श्रमदान व लोकसहभागातून जि. प. शाळेसाठी कूपनलिका व हातपंप घेऊन पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवला, तसेच शाळेच्या प्रांगणात झाडे लावून उन्हाळ्यात काळजी घेतली. शाळेतील वर्गाची रंगरंगोटीही केली. रॉन व केस यांनी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मुलांचे याबद्दल अभिनंदन केले.
शाळा व्यवस्थापन समितीतील विद्यार्थी प्रतिनिधी मुलांच्या समस्या शाळा व्यवस्थापन समितीच्या बठकीत मांडतात. समिती त्याचा विचार करते व संबधित प्रश्न सोडवते. याच शाळेत बालविकास बँक चालविण्यात येते, याअंतर्गत प्रत्येक मुलास पासबुक दिले असून मुले बँकेसारखा व्यवहार करतात. या बँकेचीही माहिती त्यांनी घेतली.
स्वप्नभूमीअंतर्गत पालम तालुक्यातील शिक्षकांनी स्कॉटलंड येथील डोरिस व पौल यांनी ‘फिलोसॉफी फॉर चिल्ड्रेन’ या विषयावर प्रशिक्षण घेतले होते. या प्रशिक्षणावर आधारित वर्ग या शाळेत घेण्यात येतात. या वर्गाचीही रॉन यांनी पाहणी केली. जिल्हाधिकारी माहिवाल यांनी जिल्ह्यातील सर्व शिक्षकांचे असे प्रशिक्षण घेण्याचा मनोदय व्यक्त केला. या साठी केस टोम्पोट यांना स्कॉटलंड येथील प्रशिक्षक डोरिस व पौल यांना पाठवण्याची विनंती केली. गावातील तरुण, मुला-मुलींनी रॉनसोबत गावच्या विकासाविषयी चर्चा केली. तसेच अंगणवाडीला भेट देऊन टम्बिलग जुडो हा खेळ बघितला. यानंतर दुपारी पाहुण्यांनी अभिनव विद्याविहार पूर्णा येथील विज्ञान केंद्रास भेट देऊन केंद्रातील साहित्याची माहिती करून घेतली. केस टोम्पोट, पिटर व्लार, खालीद, सूर्यकांत कुलकर्णी, तहसीलदार किरण अंबेकर, गटशिक्षण अधिकारी गणराज यरमाळ या वेळी उपस्थित होते. मंगळवारी रॉन यांनी केरवाडीच्या स्वप्नभूमी संस्थेत जाऊन उपक्रमांची माहिती घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolwadi happy due to visit in footballer ron wlhr