रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कोंडाणे धरणाच्या बांधकाम प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्याचा ठपका ठेवत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी बुधवारी तीन सेवानिवृत्तांसह सात अधिकाऱयांवर कारवाई केली. सध्या सेवेत असलेल्या सिंचन विभागातील एका अधीक्षक अभियंत्यासह चार अधिकाऱयांना तात्काळ निलंबित करण्यात आले असल्याचे महाजन यांनी विधान परिषदेत सांगितले. याबाबत त्यांनी नागपूरमध्ये पत्रकारांनाही माहिती दिली.
कोंडाणे धरणाच्या सुरुवातीपासूनच त्यातील विविध परवानग्यांवर शंका उपस्थित करण्यात आली होती. या धरणाच्या बांधकामाला अत्यंत वेगाने मंजुरी देण्यात आली होती. त्याचबरोबर धरणाचे काम सुरू झाल्यावर अवघ्या काही दिवसांतच त्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी धरणाच्या बांधकामाचा प्रस्तावित खर्च फुगविण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला होता.
जलसंपदा विभागाने या सर्व प्रकाराची चौकशी केल्यानंतर अधिकाऱयांच्या निलंबनाचा निर्णय घेतला. धरणाच्या बांधकाम प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता असून, आवश्यक परवानग्या घेण्यात आलेल्या नाहीत, अशा ठपका जलसंपदा विभागाने ठेवला असल्याचे महाजन यांनी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा