राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच कोकणातही गेल्या दोन दिवसांत तापमानात लक्षणीय घट झाली असून जोरदार बोचरे वारे वाहू लागले आहेत.  यंदा नोव्हेंबर महिन्याचा उत्तरार्ध सुरू झाला तरी कोकणात म्हणावी तशी थंडी नव्हती. रत्नागिरी शहरात सरासरी १८ ते २० अंश तापमान होते. पण कालपासून त्यामध्ये अचानक घट होऊन किमान तापमान १६.८ अंश नोंदले गेले. सरासरीच्या मानाने ही सुमारे ४ ते ५ अंशाची घट आहे. त्याचप्रमाणे सकाळपासून जोरदार वारे वाहत आहेत. उत्तर भारतातील कोरडय़ा व थंड वाऱ्यांमुळे हवामानात हा बदल झाला असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.  आंबा पिकाच्या दृष्टीने मात्र हा बदल स्वागतार्ह असल्याचे मानले जाते. अशाच प्रकारे पुढील महिन्यापर्यंत थंडीचे वातावरण कायम राहिल्यास वेळापत्रकानुसार झाडांवर मोहोर धरू लागेल आणि चांगले पीक येण्याच्या दृष्टीने त्याचा फायदा होईल, अशी अपेक्षा आहे.