अलिबाग – कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात २२ दिवस समुद्राला मोठी उधाणं (भरती) येणार आहेत. त्यामुळे या काळात साडेचार मीटर हून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. २० सप्टेंबरला पावसाळ्यातील सर्वात मोठी भरती कोकणवासियांना अनुभवता येणार आहे.
दरवर्षी पावसाळ्यात समुद्राला मोठी उधाण येत असतात. या उधाणांचा किनारपट्टीवरील भागांना बरेचदा तडाखा बसत असतो. त्यामुळे पावसाळ्यापूर्व समुद्राला येणाऱ्या संभाव्य मोठ्या भरतीचे अंदाजपत्रक आपत्ती व्यवस्थापन विभागा मार्फत जाहीर केले जाते. या दिवशी मच्छीमारांना तसेच किनारपट्टीवरील नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले जात असतात.
हेही वाचा >>> मावळचे अब्जाधीश खासदार श्रीरंग बारणे झाले दहावी पास; आनंदाची बातमी देताना म्हणाले…
यावर्षी पावसाळ्यात २२ दिवस मोठी उधाण येतील असा अंदाज वर्तविण्यात आला आहे. यात जून मधील सात, जुलै मधील चार, ऑगस्ट मधील पाच, आणि सप्टेंबर मधील सहा दिवसांचा समावेश आहे. या दिवशी समुद्राला साडे चार मीटर पेक्षा अधिक मोठी भरती येणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समुद्र, खाडी तसेच नदी किनऱ्यावरील गावांना स्थानिक पातळवीर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात नदी, खाडी आणि समुद्र किनाऱ्यावर एकूण ३८५ गावे आहेत. या गावांना स्थानिक पातळीवर नियोजन करण्याबाबतचे आदेश रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिले आहेत.
उधाणाचा परिणाम काय होतो
या कालावधीत उधाणांचे पाणी किनारपट्टीवरील भागात शिरण्याची शक्यता असते. समुद्र खवळलेला असतो. त्यामुळे शेतात खारेपाणी शिरून जमीन नापीक होऊ शकते. सखल भागात पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच कालावधीत अशातच मोठा पाऊस झाल्यास, पाण्याचा निचरा होण्यास अडसर होतो. ज्यामुळे नद्या, नाल्यांना पूर देखील येऊ शकतो.
मोठी भरती असलेले धोक्याचे दिवस
जून महिन्यात ५ ते ८ आणि २३ ते २५
जुलै महिन्यात २२ ते २५
ऑगस्ट महिन्यात १९ ते २३
सप्टेंबर महिन्यात १७ ते २२