एखाद्या व्यक्तीला कोटय़धीश बनविण्यापेक्षा समूह विकास करणाऱ्यांना कोटय़धीश बनविले तरच कोकणचा सर्वागीण विकास होईल. निसर्गावर आधारित आणि कोकणपणा राखून विकासाला कर्तव्य भावनेतून प्राधान्य दिले पाहिजे, असे रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले. न झालेल्या विकासाला सुरुंग लावून सुरंगीचा विकास घडवू या, असे आवाहनही त्यांनी केले.
लुपीन फाऊंडेशन सिंधुदुर्ग व डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरंगी लागवड प्रमोशन उपक्रमाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केला तेव्हा ते बोलत होते.
या वेळी कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. पराग हळदणकर, नगराध्यक्ष बबन साळगावकर, माजी आमदार राजन तेली, उमा प्रभू, प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, लुपीनचे योगेश प्रभू, अमेय प्रभू आदी उपस्थित होते.
या वेळी सुरंगीची रोपे नेमळे येथील शेतकऱ्यांना वाटप करण्यात आली. तेव्हा बोलताना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू म्हणाले, विकास करण्यासाठी हिरवळ नष्ट केली पाहिजे, असे काही जणांना वाटते, पण निसर्गाचे रक्षण करीत विकास होऊ शकतो हे सुरंगी लागवडीतून म्हणता येईल. कोकणचा सर्वागीण विकास करताना आर्थिक विकासदेखील व्हायला प्रत्येकाच्या हाताला काम मिळायला पाहिजे. सुरंगीत निसर्गाचे संरक्षण करीत आर्थिक विकास होऊ शकतो, असे प्रभू म्हणाले. कोकणाचा पर्यटन विकास होत असताना समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीचा आर्थिक विकास व्हायला पाहिजे. कोकणचा सर्वागीण विकास साधताना समाजातील आर्थिक घडी टिकविण्यासाठी प्रत्येक घटकाचा विकास साधण्यासाठी लुपीन फाऊंडेशन पुढाकार घेत आहे. सुरंगीच्या झाडांनी संसाराला पण सावली मिळेल, असे सुरेश प्रभू म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचा विकास डोळ्यासमोर ठेवून काम सुरू केले आहे. देशातील प्रत्येक घटकाचा आर्थिक विकास व्हावा म्हणून उपक्रम सुरू केले आहेत. हे उपक्रम येथील सामाजिक संस्थांच्या चळवळीतून पूर्णत्वास नेता येतील. सामाजिक संस्था सामाजिक चळवळीचा कणा आहे. त्यातून कोकणचा विकास निश्चित आहे. बचत गटांनी क्रांती घडवून दाखविली, असे सुरेश प्रभू म्हणाले.
सुरंगी प्रमोशनसाठी २७० समूहातून दीड कोटींचे उद्दिष्ट लाभार्थ्यांना अपेक्षित ठेवण्यात आले आहे. त्यामुळे समूहातून विकास करण्यासाठी सर्वानीच कर्तव्य भावनेतून काम करावे. सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंसाहाय्यता समूह गटाच्या भावनेतून काम करा आणि पुढील काळात निसर्गावर आधारित प्रकल्पातून उन्नती साधण्यासाठी प्रयत्न करा. कोकणपण राखून विकास शक्य असल्याचे दाखवून द्या, असे सुरेश प्रभू म्हणाले.
या वेळी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी सावंतवाडी नगरपालिकेच्या माध्यमातून पुढील हंगामात एक हजार सुरंगीची झाडेवाटप करून संवर्धन केली जातील, असे स्पष्ट केले. कोकण कृषी विद्यापीठाचे डॉ. पराग हळदणकर व माजी आमदार राजन तेली यांनी विचार मांडले. प्रताप चव्हाण यांनी लुपीनचे कार्य तर नारायण परब यांनी सूत्रसंचालन केले. लुपीनचे योगेश प्रभू यांनी स्वागत केले.
या वेळी बाळासाहेब परुळेकर, रामानंद शिरोडकर, रणजीत सावंत, मोहन होडावडेकर, राजू राऊळ, जि. प. माजी अध्यक्ष काका कुडाळकर, आनंद वझे, महेशकुमार चव्हाण, तसेच मान्यवर उपस्थित होते.