कोकणातील आंबा बागायतदारांच्या विविध समस्यांवर चर्चा करून उपाययोजना सुचवण्यासाठी आज (६ डिसेंबर) येथे खास आंबा परिषद आयोजित करण्यात आली आहे.  रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांतील मिळून आंबा बागायतदारांच्या सहा संघटनांनी परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला असून महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड अ‍ॅग्रिकल्चर या संस्थेचा पाठिंबा लाभला आहे. राज्याचे कृषिमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्या सकाळी १० वाजता येथील स्वातंत्र्यवीर सावरकर नाटय़गृहात या परिषदेचे उद्घाटन होणार असून त्यानंतर आंबा बागायतीशी संबंधित विविध मुद्दय़ांवर चर्चासत्रे आयोजित करण्यात आली आहेत. आंब्याची लागवड, काढणीतंत्र, काढणीपश्चात व्यवस्थापन, विक्री व्यवस्थापन इत्यादी विषयांचा त्यामध्ये समावेश आहे.
गेल्या काही वर्षांत कोकणातील आंबा लागवडीखालील क्षेत्र वेगाने वाढले आहे. त्याचबरोबर हवामानातील बदलाचाही फटका या क्षेत्राला सातत्याने बसत आहे. त्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. या पाश्र्वभूमीवर प्रथमच कोकणात ही परिषद होत आहे. परिषदेच्या अखेरच्या सत्रात दिवसभरातील चर्चेच्या आधारे काही शिफारसीही शासनाला करण्यात येणार आहेत. त्यामुळे कोकणातील आंबा बागायतदारांच्या दृष्टीने ही परिषद महत्त्वाची मानली जाते. संपूर्ण कोकणातील मिळून सुमारे एक हजार आंबा बागायतदार परिषदेत सहभागी होतील, असा अंदाज आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा