रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग जिल्ह्यातील मासळी साठ्याला गोवा प्रवेश बंदी झाल्यानंतर आता ही मासळी कर्नाटकातील मंगळूरकडे नेण्यात येत आहे. मात्र हे अंतर रत्नागिरीतून तब्बल आठशे किलोमीटर लांब असल्याने सध्या मत्स्य व्यवसायिकांना मत्स्यवाहतुकीचा सर्वार्थाने द्राविडी प्राणायाम करावा लागतो आहे.
प्रत्येक राज्याच्या किनारपट्टीनजिक मासळीचे वेगवेगळे प्रकार मिळतात. रत्नागिरी- सिंधुदूर्गमधील मासळीचे प्रकार गोव्यात मिळत नाही. रत्नागिरीत मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचा दुय्यम दर्जाचा मत्स्य साठा मिळतो. त्यामुळे या वैविध्यपूर्ण मासळीला गोव्यात खूप मागणी आहे. साहजिकच स्थानिक बाजारपेठेपेक्षा रत्नागिरीचे मासे गोव्यातील बाजारपेठा आणि कंपन्यांमध्ये अधिक लोकप्रिय आहेत. मात्र पाच दिवसांपूर्वी मालवणनजिक मच्छीमारांनी बेकायदा पर्ससिन नौका किनारयावर आणून त्यातील मच्छीमारांना बेदम चोप दिला. तसेच त्यातील मासळी साठ्याचीही नासधूस केली. त्यामुळे गोव्यातील मच्छीमार संतापला आहे.
गोव्यातील मच्छीमार आणि नौकामालकांचे संघटन मजबूत आहे. या पाश्र्वभूमीवर गोव्यात संवेदनशील परिस्थिती उद्भवू शकते, याची जाणीव गोवा पोलिसांना झाल्याने कोकणातील मत्स्य वाहतूकदारांना सूचना देऊन सीमेवरूनच परत पाठविण्याचे धोरण आखण्यात आले आहे. त्यामुळे आता मत्स्यव्यवसायिकांना हा माल कर्नाटकमधील मंगळूरच्या दिशेने पाठवावा लागत आहे. मात्र या द्राविडी प्राणायामामुळे वाहतुकीचा अधिक खर्च सोसावा लागत असल्याने मासळीचे दर कमी करण्याची वेळ मत्स्यव्यवसायिकांवर आली आहे. दरम्यान , समुद्रात सध्या मासळी मिळण्याचे प्रमाण अचानक कमी झाले आहे. हण्र बंदरावर येणारा कमी प्रमाणातील मासळीसाठा आणि किनारयावर थांबलेल्या बोटी यावरून समुद्रातील मत्स्य तुटवड्याची स्थिती स्पष्ट झाली आहे. साहजिकच मासे कमी येत असल्यान सध्या तरी फारसे नुकसान होत नसल्याचे मत्स्यव्यवसायिकांचे म्हणणे आहे.
कोकणच्या मासळीला गोव्यात अघोषित बंदी असल्याच्या वृत्ताला दुजोरा देताना रत्नागिरीचे मच्छीमार नेते खालिद वस्ता यांनी सांगितले की, एक पर्ससिन बोट जेवढा माशांचा साठा आणते. तेवढा साठा आणण्यासाठी एका पारंपरिक नौकेला ५० फेऱ्या माराव्या लागतात. आता तर एलईडी पर्ससिन मच्छीमारीने समुद्रातील मत्स्य साठाच संपायला लागला आहे. त्यामुळे शाश्वत मच्छीमारीसाठी कोकणवासियांचा आग्रह योग्यच आहे. भविष्यात मासळी मिळेनाशी व्हायची परिस्थिती आली तर मागणी आणि दरासाठीचा आटापिटा दुय्यम ठरणार आहे.