कोकणातील वनसंपदा सातत्याने लागणाऱ्या वणव्यामुळे अडचणीत आली आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वणव्यातील ९० टक्के वणवे हे मानवनिर्मित आहे. वणव्यामुळे नैसर्गिक साधनसंपतीची तर हानी होतेच आहे, मात्र जंगलातील पशुपक्ष्यांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. त्यामुळे वणवे रोखण्यासाठी वनविभागाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम हाती घेण गरजेचे आहे.
साधारणपणे हिवाळ्याच्या शेवटी आणि उन्हाळ्याच्या सुरवातीला कोकणातील जंगलामधे वणवे लावले जातात. कोकणी माणसामध्ये असलेले गैरसमज याला कारणीभूत ठरतात. जंगलांना वणवे लावले की पुढील वर्षी जंगलात चांगले गवत उगवते. हे गवत जनावरांच्या चाऱ्यासाठी उपयुक्त ठरते म्हणून दरवर्षी उन्हाळ्यात जंगलांना आगी लावण्याची पंरपरा पाहायला मिळते. दुसरीकडे सरपणाला लाकूड मिळावे यासाठी डोंगरालगत राहणारे गावकरी वणवे पेटवतात.
वणव्यामुळे झाडे सुकतात आणि पर्यायाने हे लाकूड सहज तोडता येते.   अलीकडच्या काळात वणवे लावण्याच्या उद्देशात आणखीन एक भर पडली आहे, ती म्हणजे शिकारीसाठी. रानडुकरांच्या तसेच वन्यप्राण्याच्या शिकारीसाठीही जंगलांना आगी लावल्या जातात. एकदा वणवा पेटला की वन्य प्राणी आगीच्या विरुद्ध दिशेने पळायला सुरवात करतात. त्यामुळे या वन्यजीवांची शिकार करणे सहजशक्य होते. कर्जत, माणगाव परिसरात मोहाची फुले वेचण्यासाठी वणवे लावले जातात. जळलेल्या गवतात मोहाची फुले सहज वेचता येतात.
 सातत्याने लावल्या जाणाऱ्या या आगींमुळे कोकणातील वनसंपदा अडचणीत आली आहे. वन्यजीवांचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पशुपक्ष्याचे हकनाक बळी जात आहे. सुरवातीला जंगलापुरता मर्यादित असणारा हा प्रश्न आता आसपासच्या परिसरासाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. अनियंत्रित वणवे आता जंगलालगतच्या गावात शिरण्यास सुरवात झाली आहे. आदिवासी वाडय़ा या वणव्यांच्या भक्ष्यस्थानी पडत आहे. गेल्या तीन दिवसातील अनियंत्रित वणव्यांनी महाड, पोलादपूर, पेण, अलिबाग तालुक्यातील कुर्डुस परिसराला याचाच अनुभव आला आहे. निसर्गाच्या मुळावर उठलेल्या मानवालाही आता या वणव्यांनी कोप दाखवायला सुरवात केली आहे. चिंबरान आदिवासी वाडीतील चौदापैकी तेरा घरांना भस्मसात करून या कुटुंबाच्या जीवनाची राखरांगोळी केली आहे. घराबरोबरच धान्य, कपडे, भांडी, कोंबडय़ा, शेळ्या जळून खाक झाल्या आहेत. महाडमधील वरंध घाट परिसरात लागलेल्या वणव्याच्या आगीत होरपळून एका महिलेचा मृत्यू झाला आहे.  त्यामुळे कोकणातील वणव्यांच्या मानवनिर्मित समस्येला गांभीर्याने घेण्याची वेळ आली आहे. वनांच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्यांची ठोस अंमलबजावणी करण्याची आता वेळ आली आहे. केवळ कायद्याचा बडगा उभारूनही हा प्रश्न सुटणार नाही, तर या वनांच्या संरक्षणासाठी व्यापक जनजागृती कार्यक्रम हाती घेणे गरजेचे आहे. वनांचे महत्त्व आणि वणव्यांचे मानवी जीवनावर होणारे घातक परिणाम याचे महत्त्व लोकांना पटवून द्यावे लागणार आहे. यासाठी हिरवळ, सह्य़ाद्री मित्रमंडळ, निसर्गमित्र संघटना यांसारख्या सामाजिक संस्थांची मदत घेणे गरजेचे आहे; अन्यथा हिरव्यागार कोकणातील वनसंपदा धोक्यात यायला वेळ लागणार नाही. मात्र अपुरा कर्मचारी वर्ग असल्याचे कारण पुढे करत वनविभाग या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत असल्याचे पाहायला मिळते आहे.  

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा