राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एन.सी.सी.) २ (महा) नेव्हल युनिट एन.सी.सी. रत्नागिरीच्या कार्यालय यांच्यातर्फे आयोजन करण्यात आलेल्या कोकण कीर्ती सागरी नौकाभ्रमण मोहिमेच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाली असून मंगळवारी अलिबागमध्ये तिचे आगमन झाले. या मोहिमेत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्य़ांमधील एन.सी.सी. नेव्हल युनिटचे ४३ छात्रसैनिक सहभागी झाले आहेत.
२ (महा) नेव्हल युनिट एन.सी.सी. रत्नागिरीच्या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्य़ांमधील एन.सी.सी. नेव्हल युनिटच्या छात्रसैनिकांसाठी २३ जाने.पासून रत्नागिरी ते मुंबई व परत रत्नागिरी अशी ६०० कि.मी. अंतराची कोकण कीर्ती सागर नौकाभ्रमण मोहीम आयोजित करण्यात आली आहे. भारतीय नौसेना कमांडर अमीत कुमार सन्याल यांच्या नेतृत्वाखाली २३ जानेवारी रोजी रत्नागिरी येथून मोहिमेला प्रारंभ झाला. २७ जानेवारी रोजी मुंबईत ही मोहीम पोहोचली. परतीच्या प्रवासात आज या मोहिमेचे अलिबागमध्ये आगमन झाले. यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर या तीन जिल्ह्य़ांमधील एन.सी.सी. नेव्हल युनिटचे ४३ छात्रसैनिक सहभागी झाले आहेत. या मोहिमेचे अलिबागमध्ये आगमन होताच सरखेल कान्होजी आंग्रे यांचे वंशज राघुजी आंग्रे यांनी त्यांचे स्वागत केले. जे. एस. एम. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील, महाविद्यालयातील एन.सी.सी. प्रमुख मोहसीन खान, अनिल तुळपुळे आदी मान्यवर या वेळी उपस्थित होते.
शिडाच्या दोन होडय़ांमधून या मोहिमेने कोकण किनारपट्टीवरील १० बंदरांना भेट दिली. अलिबाग, रेवदंडा, दिघी, श्रीवर्धन, हर्णे, दाभोळ, मुरुड, जयगडमार्गे ही मोहीम रत्नागिरीत पोहोचणार आहे.
छात्रसैनिकांमध्ये समुद्रातील पाण्यात प्रवास करण्याचे धाडस निर्माण व्हावे, त्यांच्यात धाडसी वृत्ती वाढावी, आत्मविश्वास वाढवा, त्यांना शिडाच्या नौका चालविण्याचे प्रशिक्षण मिळावे, शिडाच्या होडय़ा चालविण्याचे प्रशिक्षण देणे व अखिल भारतीय सागरी नौकाभ्रमण मोहीम स्पर्धेची तयारी म्हणून ही मोहीम आयोजित करण्यात येते. रत्नागिरी विभागाने सलग तीन वेळा ही स्पर्धा जिंकून हॅट्ट्रिक केली आहे, अशी माहिती या मोहिमेचे नेतृत्व करणारे अमीत कुमार सन्याल यांनी दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा