राज्य मंत्रिमंडळाच्या शुक्रवारी झालेल्या विस्तारामध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम आणि आमदार दीपक केसरकर यांचा समावेश झाल्यामुळे अखेर कोकणाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
गेल्या ३१ ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली, त्या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित होते. पण शिवसेनेचा सत्तेमध्ये सहभाग नव्हता. उलट, त्यानंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात झालेल्या विधिमंडळाच्या विशेष अधिवेशन काळात सेनेचे सदस्य विरोधी पक्षाच्या बाकांवर होते. पण गेल्या महिनाभरात सेना आणि भाजपच्या नेत्यांमध्ये विविध पातळ्यांवर झालेल्या चर्चेच्या अनेक फेऱ्यांनंतर अखेर राज्यात १९९५ नंतर पुन्हा एकदा भाजप-सेना युतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी राज्याच्या मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. त्यामध्ये शिवसेनेच्या वाटय़ाला आलेल्या मंत्रिपदांपैकी कॅबिनेट मंत्री म्हणून कोकणातील शिवसेनेचा ढाण्या वाघ, असे वर्णन केल्या जाणाऱ्या रामदास कदम यांनी शपथ घेतली. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे माजी खासदार नीलेश राणे यांना उघड विरोध करत शिवसेनेचे उमेदवार विनायक राऊत यांचा प्रचार केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दीपक केसरकर यांनी गेल्या ऑगस्टमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आणि त्यापाठोपाठ आलेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर ते निवडूनही आले. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातून सेनेचे जिल्हाप्रमुख वैभव नाईक हेही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांचा पराभव करून विजयी झाले आहेत. पण ज्येष्ठतेच्या मुद्दय़ावर केसरकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ आज पडली.
या दोन ज्येष्ठ नेत्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशामुळे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात शिवसेनेची पकड आणखी मजबूत होणार आहे. त्या व्यतिरिक्त रत्नागिरी जिल्ह्य़ातून सदानंद चव्हाण (चिपळूण), उदय सामंत (रत्नागिरी) आणि राजन साळवी (राजापूर) हे अनुभवी आमदारही त्यांच्या साथीला आहेत. १९९५ मध्ये राज्यात युतीचे सरकार प्रथम सत्तेवर आले तेव्हाही कोकणातून शिवसेनेचे उमेदवार मोठय़ा आघाडीने विजयी झाले होते. त्या मंत्रिमंडळामध्ये मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्यासह सुमारे अर्धा डझन मंत्री कोकणातील होते. पण कोकणच्या विकासाच्या दृष्टीने फारसे काही घडू शकले नाही. सध्याच्या मंत्रिमंडळातील भाजपचे ज्येष्ठ नेते विनोद तावडे हेही कोकणातील असून त्यांचा या प्रदेशाशी घनिष्ठ संपर्क असतो. त्यापाठोपाठ आता शिवसेनेचे कदम व केसरकर मंत्रिमंडळात सहभागी झाल्यामुळे या सरकारकडून तरी कोकणच्या विकासासाठी ठोस योजना राबवल्या जातील, अशी आशा कोकणवासीय बाळगून आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा