निसर्गरम्य कोकणात पर्यटनाला भरपूर वाव असला तरी हे क्षेत्र योग्य प्रकारे विकसित होण्यासाठी पायाभूत सुविधांची गरज असल्याची सूचना या क्षेत्राशी निगडित व्यावसायिकांनी केली आहे.
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, राज्य सांस्कृतिक संचालनालय आणि सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय संस्था यांच्यातर्फे दापोली तालुक्यात मुरुड-हर्णे-वेळास येथे डॉल्फिन-कासव महोत्सव आयोजित करण्यात आला. तीन दिवसांच्या या महोत्सवाची काल (१७ मार्च) सांगता झाली. राज्याच्या विविध भागातील पर्यटकांनी या निमित्ताने या पर्यटनस्थळांची प्रथमच मोठय़ा प्रमाणात माहिती घेऊन आगामी काळात प्रत्यक्ष भेटीची इच्छा व्यक्त केली. राज्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनीही या ठिकाणी भेट देऊन स्थानिक व्यावसायिकांशी चर्चा केली. या प्रसंगी सुवर्णदुर्ग पर्यटन विकास बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष शैलेश मोरे, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि अन्य व्यावसायिकांनी अडचणी मांडल्या. त्यामध्ये तालुक्याच्या अंतर्भागातील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय आकर्षक स्थळांपर्यंत जाण्यासाठी चांगले रस्ते नसल्याची मुख्य अडचण नमूद केली. त्याचप्रमाणे सीआरझेड कायदा, पर्यटन विभागाचे नियम आणि अन्य पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे या क्षेत्राच्या विकासात अडथळे येत असल्याचे स्पष्ट केले. पर्यटन क्षेत्रातील विविध व्यावसायिकांसाठी लघु मुदतीचे प्रशिक्षण वर्ग पर्यटन विभागाने आयोजित करण्याची मागणी या प्रसंगी करण्यात आली. भुजबळ यांनी या सर्व बाबींची नोंद घेऊन शक्य त्या उपाययोजनांसाठी तातडीने पावले उचलण्याची हमी दिली.     
दरम्यान मुरुडच्या समुद्र किनाऱ्यावर १५ ते १७ मार्च या कालावधीत झालेल्या या महोत्सवाची सुरुवात दापोलीतून शोभायात्रेने झाली. पर्यटकांसाठी सागरी सफर, बीचवरील कबड्डी व क्रिकेट स्पर्धा, पतंग महोत्सव, कोकणी लोककलांची झलक दाखवणारा सांस्कृतिक कार्यक्रम, वेळासच्या समुद्र किनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांची पैदास आणि संवर्धनाचे प्रात्यक्षिक इत्यादी विविध कार्यक्रम या महोत्सवात आयोजित करण्यात आले.  
पर्यटन महामंडळाने स्थानिक संस्थेच्या सहकार्याने अशा प्रकारे प्रथमच आयोजित केलेल्या या अभिनव उपक्रमामुळे भावी काळात या परिसरातील पर्यटन स्थळांना चांगली पसंती राहील, असा विश्वास मोरे यांनी, तर महामंडळाच्या सरव्यवस्थापक किशोरी गद्रे यांनी, स्थानिकांच्या सहभागातून कोकणातील दुर्लक्षित पण निसर्ग रमणीय स्थळे पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचा मनोदय व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा