कोकण रेल्वे मार्गावरील निरनिराळ्या गाडय़ांमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ८२ प्रवाशांवर तपासनीसांनी कारवाई करून २६ हजार ३३३ रुपयांचा दंड वसूल केला. कोकणातून मुंबईत ये-जा करण्यासाठी अतिशय सोयीचे असलेल्या कोकण रेल्वेच्या निरनिराळ्या गाडय़ांमधून अनेकजण विनातिकीट प्रवास करतात, अशी तक्रार होती. त्याआधारे रेल्वेच्या तिकीट तपासनीसांनी एकाच दिवशी मत्स्यगंधा एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, रत्नागिरी दादर पॅसेंजर, दिवा-सावंतवाडी व सावंतवाडी-दिवा पॅसेंजर या गाडय़ांमध्ये तिकीट तपासण्याची धडक मोहीम घेतली. त्यामध्ये हे प्रवासी विनातिकीट असल्याचे उघडकीस आले. त्यांच्याकडून जागेवर दंड वसूल करण्यात आला.
मडगाव-मंगळूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस
कोकण रेल्वेमार्गावरील मडगाव ते  मंगळूर या स्थानकांदरम्यान येत्या सोमवारपासून (२४ फेब्रुवारी) सुपरफास्ट इंटरसिटी एक्स्प्रेस नियमितपणे धावणार आहे. या नवीन गाडीला २३ फेब्रुवारी रोजी एका खास कार्यक्रमात हिरवा झेंडा दाखवण्यात येणार आहे. मंगळुरु येथून ही गाडी त्या दिवशी सकाळी सव्वाआठ वाजता निघणार असून दुपारी दोन वाजता मडगावला पोचणार आहे. त्यानंतर दुपारी सव्वाचार वाजता ही  गाडी मडगावहून निघून रात्री दहा वाजता मंगळुरुला पोचणार आहे.

Story img Loader