गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वेने खूशखबर दिली आहे. कोकण रेल्वे मार्गावर गणेशोत्सवासाठी विशेष गाड्यांची घोषणा करण्यात आली आहे. १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबरपर्यंत या ट्रेन धावणार आहेत. या काळात ८२ अप तर ८२ डाउन अशा एकूण १६२ ट्रेन कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. मध्य रेल्वेकडून अधिकृत वेळापत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. सध्या करोनाचं विघ्न आल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाऊ इच्छिणाऱ्या अनेक चाकरमान्यांची निराशा झाली होती. मात्र कोकण रेल्वेच्या या घोषणेमुळे त्यांना दिलासा मिळाला आहे.
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथून कोकणासाठी या विशेष गाड्या धावणार आहे. सावंतवाडी, कुडाळ आणि रत्नागिरीसाठी या ट्रेन धावतील. गणेशोत्सवात प्रवाशांची होणारी गर्दी टाळण्यासाठी या विशेष ट्रेन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १५ ऑगस्टपासून या ट्रेनचं बुकिंग सुरु होणार आहे. कन्फर्म तिकीट असणाऱ्यांनाच या ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा असणार आहे.
मध्य रेल्वेने प्रवाशांना प्रवास करताना करोनाशी संबंधित सर्व नियम पाळण्याचं आवाहन केलं आहे.