गणेशोत्सवावरून मुंबईच्या दिशेने परतणाऱ्या प्रवशांच्या संतापाचा उद्रेक झाल्याचा प्रकार रविवारी खेड रेल्वे स्थानकात पहायला मिळाला. मडगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी मांडवी एक्स्प्रेसचे दरवाजे गर्दीमुळे न उघडल्यानं खेड स्थानकावरील प्रवाशांनी रविवारी गोंधळ घातला. तसंच यावेळी संतप्त प्रवाशांनी स्टेशन मास्तरांनाही घेराव घातला.

गणेशोत्सवासाठी कोकणात गेलेले चाकरमानी आता मुंबईत परतण्यास सुरूवात झाली आहे. खेड स्थानकावरील प्रवाशांना रविवारी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. खेड स्थानकातून अनेक चाकरमान्यांनी मुंबईत परण्यासाठी मांडवी एक्स्प्रेसचे तिकिट आरक्षित केले होते. मांडवी एक्स्प्रेस खेड स्थानकात आल्यानंतरही गाडीतील प्रचंड गर्दीमुळे डबे उघडले नाही. त्यामुळे खेड स्थानकातून तिकिट आरक्षित केलेल्या प्रवाशांना गाडीत चढता आले नाही. त्यातच काही वेळात गाडी सुटल्याने प्रवासी संतप्त झाले. त्यानंतर काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांना घेराव घालत गोंधळ घातला.

त्यातच काही वेळाने हॉलिडे एक्स्प्रेस येत असल्याची घोषणा रेल्वे स्थानकात करण्यात आली. तसंच या गाडीला अतिरिक्त डबे जोडण्यात आल्याचे प्रवाशांना सांगण्यात आले. परंतु या गाडीतही गर्दी असल्याने काही प्रवाशांना गाडी पकडता आली नाही. त्यामुळे काही संतप्त प्रवाशांनी हॉलिडे एक्स्प्रेसच्या एसी डब्याची तोडफोड केल्याचा प्रकारही घडला.

Story img Loader