रत्नागिरी : मध्य रेल्वेच्या पनवेल-कळंबोली मार्गावर मालगाडीचे डबे घसरल्याने फटका कोकण रेल्वे मार्गावरील गाडय़ांचे वेळापत्रक सलग दोन दिवस विस्कळीत झाले आहे. आत्तापर्यंत या मार्गावरील १२ गाडय़ा रद्द करण्यात आल्या असून ५ गाडय़ा अंशत: रद्द केल्या आहेत, तर तीन गाडय़ांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. त्यामुळे प्रवाशांना फटका बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गेल्या शनिवारी सायंकाळी पनवेलजवळ मालगाडी घसरल्याने रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. हा मार्ग पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू झाले; पण दोन दिवस होऊनही ते पूर्ण न झाल्यामुळे कोकण-गोव्याकडून शनिवारी मुंबईला जाणाऱ्या रेल्वेगाडय़ा रविवारी पहाटे सोडण्यात आल्या. परिणामी, रविवारी सकाळी मुंबईतून कोकणाकडे गाडय़ा येऊ शकल्या नाहीत. त्यामुळे दिवा येथे अडकून पडलेल्या प्रवाशांनी रविवारी सकाळी आंदोलन केले. याचबरोबर, कोकण रेल्वेमार्गावर निरनिराळय़ा ठिकाणीही अनेक प्रवासी अडकून पडले. रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्यात न आल्यामुळे तिकिटाचे पैसे परत  घेऊन रेल्वे स्थानकातील प्रवाशांना बस स्थानक गाठावे लागले. जोडीला मुसळधार पाऊस असल्यामुळे आणखी तारांबळ उडाली.  या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळातर्फे कोकणात अडकलेल्या प्रवाशांसाठी पनवेलपर्यंत काही जादा गाडय़ा सोडण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >>> २९ तास रखडपट्टी; कोकण रेल्वेवर प्रवाशांचे अतोनात हाल, मालगाडी घसरल्याने अनेक गाडय़ांचा खोळंबा

अलिबाग: शनिवारी पनवेलजवळ मालगाडी घसरून झालेल्या अपघातानंतर कोकण रेल्वेवरील वाहतूक विस्कळीत झाली. आज दिवसभर या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होती. रायगड जिल्ह्यातील विविध स्थानकांमध्ये गाडय़ा तासनतास अडकून पडल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांचे मोठे हाल झाले.

काल रात्रीपासूनच या अपघाताचा कोकण रेल्वे मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. कोकणातून येणाऱ्या गाडय़ा उशिराने सुटल्या. आज सकाळपासून कोकण कन्या एक्स्प्रेस वीर स्थानकात, तर करमाळी पनवेल गणपती विशेष गाडी माणगाव स्थानकात थांबली. रायगडमधील करंजाडी, विन्हेरे , नागोठणे अशा विविध स्थानकांत गाडय़ा उभ्या होत्या. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. तासनतास वाट पाहिल्यानंतर रेल्वेकडून गाडी सुटण्यासंदर्भात कुठल्याच सूचना मिळत नव्हत्या. त्यामुळे अनेक प्रवाशांनी पायपीट करत महामार्गावरून जाणाऱ्या एसटी बसेस आणि वाहनांच्या साहाय्याने मुंबई गाठण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनाही तिष्ठत उभे राहावे लागले.

प्रवाशांचा संताप

या गाडय़ा स्थानकात ७ ते ८ तास थांबल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. यामुळे महिला प्रवाशांची फारच कुचंबणा होत होती. वृद्ध आणि लहान मुलांचे हाल झाले. रेल्वेने कुठलीच पर्यायी व्यवस्था न केल्याने रखडपट्टी झालेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. अपघात झालेला असताना गाडय़ा का सोडल्या, असा प्रश्न उपस्थित केला गेला.

रखडलेल्या प्रवाशांच्या मदतीला स्थानिक नागरिक, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्था धावून आल्या. रेल्वे स्थानकात स्वच्छता मोहिमेसाठी आलेल्या कार्यकर्त्यांनी या प्रवाशांना पाणी आणि बिस्कीट पुडे पुरवले. तर दुपारी काही संस्थांनी जेवणाची व्यवस्था केली.

एसटीला तोबा गर्दी

रखडलेल्या प्रवाशांनी आपला मोर्चा एसटीकडे वळवला. माणगाव आणि महाड बस स्थानकात प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. एसटी बस पकडण्यासाठी अक्षरश: झुंबड उडत होती. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटीने जादा गाडय़ा सोडल्या. माणगाव स्थानकातून दुपापर्यंत मुंबई, पनवेल, बोरिवली मार्गावर १९ जादा बसेसची व्यवस्था करण्यात आली होती.

ठप्प झालेली कोकण रेल्वे संध्याकाळच्या सुमारास रुळावर येण्यास सुरुवात झाली. वीर स्थानकात थांबलेली कोकणकन्या एक्स्प्रेस संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने मार्गस्थ झाली. त्यानंतर काही गाडय़ा मार्गस्थ झाल्याचे सांगण्यात आले.

सावंतवाडी : मध्य रेल्वेच्या पनवेल जवळपास मार्गावर मालगाडी रुळावरून घसरली असल्याने कोकण रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले, तर काही रेल्वे गाडय़ा रद्द केल्याने चाकरमानी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. तर काही गाडय़ा पर्यायी मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले असल्याने सावंतवाडी, कुडाळ, सिंधुदुर्ग, कणकवली रेल्वे स्थानकांवर प्रचंड गर्दी झाली. यामुळे पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

दरम्यान कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई म्हणाले, रविवारी रद्द झालेल्या गाडय़ांच्या तिकिटाचे पैसे परत मिळणार आहेत.

गौरीगणपती सणाच्या पार्श्वभूमीवर चाकरमानी मोठय़ा प्रमाणात गावोगावी आलेले आहेत. सोमवारपासून नोकरी, शाळेत जायला हवे म्हणून चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची गैरसोय, गर्दी पाहून लोक हैराण झाले आहेत.

काल शनिवारी मालगाडी रुळावरून घसरली होती; पण गावोगावी आलेल्या चाकरमान्यांना याबाबत कल्पना नव्हती. त्यामुळे आज मुंबईच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या चाकरमानी प्रवाशांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानक गाठले तेव्हा रविवार दि. १ ऑक्टोबरच्या रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत, तर मुंबईहून मडगाव येथे धावणाऱ्या रेल्वे गाडय़ा पर्यायी पुणे-मडगाव मार्गावरून धावणार आहेत, असे सांगितले. त्यामुळे रेल्वे स्थानकावर एकच कल्लोळ माजला.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रेल्वे स्थानकावर प्रवाशांचा कल्लोळ झाला. त्यामुळे पोलीस निरीक्षक व सहकारी अधिकारी स्थानकावर पोहोचले. दरम्यान रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांची गैरसोय झाली, तर रेल्वेने तिकिटाचे पैसे देण्याची तयारी दर्शविली. मात्र चाकरमानी परतीच्या प्रवासाला लागले होते ते नैसर्गिक परिस्थितीसमोर हतबल झाले. या दरम्यान काही चाकरमान्यांनी प्रवासी बसमधून प्रवास करण्याची तयारी दाखवली.

रविवार दि. १ ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, दिवा एक्स्प्रेस, मंगळूर एक्स्प्रेस आणि जादा रेल्वे गाडय़ा रद्द करण्यात आल्या होत्या, तर मुंबई ते मडगाव धावणाऱ्या जनशताब्दी एक्स्प्रेस, नेत्रावती एक्स्प्रेस, गोवा संपर्क क्रांती एक्स्प्रेस या रेल्वे पर्यायी पुणे- मडगाव मार्गावरून वळविण्यात आल्या आहेत. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवासी मडगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्यांना रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानकावर सोडण्याची मागणी करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या पनवेल स्थानकाजवळपास मालगाडी रुळावरून घसरली होती, त्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वेळापत्रक कोलमडले आहे. दरम्यान मार्ग मोकळा होत असल्याने मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आणि गुजरातकडे जाणारी उधना एक्स्प्रेस संध्याकाळी उशिराने धावणार आहे, असे रेल्वे स्थानकावरून सांगण्यात आले आहे.

दरम्यान रविवार दि. १ ऑक्टोबर रोजीच्या रेल्वेमार्गावर धावणाऱ्या गाडय़ा रद्द करण्यात आल्याने सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून प्रवासी तिकिटाची रक्कम ४९ हजार ६३१ रुपये परत रोख स्वरूपात देण्यात आले, तर ऑनलाइन तिकीट रक्कम बँक खात्यात जमा होणार आहे, असे सांगण्यात आले.

कोकण रेल्वे मार्गावरील कोकणकन्या एक्स्प्रेस, मांडवी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, दिवा एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. मात्र रेल्वे मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी जनशताब्दी एक्स्प्रेस आणि गुजरातच्या दिशेने जाणारी उधना एक्स्प्रेस हळूहळू धावणार आहे, असे सावंतवाडी रेल्वे स्थानकावरून सांगण्यात आले.

कोकण रेल्वे ठप्प झाल्याने आमचे खूपच हाल झाले. मला आज कामावर हजर व्हायचे होते, परंतु ते शक्य झाले नाही. रेल्वेने कुठलीही पर्यायी व्यवस्था केली नाही किंवा जेवण, चहापाणीदेखील दिले नाही. गणेशोत्सवासाठी कोकणात येताना खास गाडय़ा सोडल्या होत्या, परंतु परतीच्या प्रवासात आमची रखडपट्टी झाली.

प्रज्ञा परब, प्रवासी