दिवा- सावंतवाडी पॅसेंजर घसरल्यामुळे रविवार सकाळपासून विस्कळीत झालेली कोकण रेल्वेसेवा १९ तासांच्या अथक दुरुस्तीनंतर सोमवारी पुन्हा एकदा सुरू झाली. मात्र सेवेचे वेळापत्रक मात्र पुरते कोलमडले आहे. नागोठणेनजीक भिसे खिंडीत इंजिन आणि चार डबे घसरल्याने झालेल्या या अपघातातील मृतांची संख्या २० असून १५५ प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघाताचे कारण अद्यापही स्पष्ट न झाल्याने तर्कवितर्काना ऊत आला असला तरी ऐन मोसमात रेल्वे पुन्हा धावू लागल्याने चाकरमान्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मृतांच्या आप्तांना प्रत्येकी २ लाख रुपयांची तर जखमी प्रवाशांना ५० हजार रुपयांची मदत सोमवारी जाहीर केली. जखमी प्रवाशांचा शासकीय आणि रेल्वे रुग्णालयातील उपचार खर्चही राज्य सरकार करणार असल्याचे त्यांनी रोहा येथे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.चव्हाण यांनी अपघातस्थळाची पाहणी केली तसेच रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.
मुख्यमंत्र्यांना रेड कार्पेट
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे जखमींची विचारपूस करण्यासाठी रोहा उपजिल्हा रुग्णालयात येणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्यांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वारापासून चक्क रेड कार्पेट घातले होते. रुग्णालय परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्तही होता. या संपूर्ण प्रकाराबद्दल रुग्णांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर होता. रुग्णालय प्रशासनाला परिस्थितीचे भान राहिले नाही, अशी चर्चा सुरू होती.
कोकण रेल्वे मार्गावरील अपघातांमुळे नागरिकांमधील असुरक्षिततेची भावना दूर करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने उपाय योजावेत, असे ते म्हणाले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा