लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या प्रकल्पाचा अर्पण सोहळा पार पाडला आहे. या टर्मिनसपर्यंत सावंतवाडी ते दिवा गाडी नेण्यात यावी तसेच राज्यराणी रेल्वेच्या डब्यांत वाढ करून तेवीस करावेत अशी मागणी आहे.
कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांना रेल्वेच्या प्रवासात अनेक विघ्ने येत आहेत. कोकण रेल्वे मार्गावरून अनेक रेल्वे धावत असल्या तरी चाकरमानी प्रवाशांना अचानक तिकीट आरक्षण मिळणे अवघड बनत आहे.
सावंतवाडी-दिवा या पॅसेंजर गाडीचा प्रवास फारच खडतर होत आहे. मडगाव ते दिवा धावणाऱ्या या रेल्वेत प्रवाशांची संख्या पाहता आणखी एक पॅसेंजर या मार्गावर सुरू करण्याची गरज आहे. या पॅसेंजरला होणारी गर्दी पाहता चाकरमानी लोकांना ही गाडी ठाणे, दादर किंवा कुर्ला स्थानकापैकी एका स्थानकापर्यंत पोहोचावी, अशी सुमारे दहा वर्षांपेक्षा जास्त काळ मागणी आहे.
सावंतवाडी ते दिवा रेल्वे किमान ठाणेपर्यंत नेल्यास आणखी दुपटीने प्रवाशी संख्या वाढणार आहे. सध्या लोकमान्य टिळक टर्मिनस प्रकल्प खुला करण्यात आला आहे. तिथपर्यंत ही रेल्वे जावी अशी मागणी आहे. त्यासाठी कोकणातील व मुंबईतील खासदारांनी एकजूट दाखवावी अशी अपेक्षा असून लोकसभेच्या निवडणुका तोंडावर असल्याने चाकरमानी प्रवाशांनी आवाज उठविण्याची अपेक्षा व्यक्त केली.
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी सावंतवाडी ते दादर या राज्यराणीचा प्रवास फारच खडतर आहे. फक्त १२ डब्यांची धावणारी ही रेल्वे कायमच हाऊसफुल्ल असते. त्याकरिता या रेल्वेच्या डब्यांत वाढ करून वीस डब्यांची रेल्वे धावावी अशी मागणी आहे.
राज्यराणी रेल्वे रात्रौच्या वेळी धावते, पण या रेल्वेच्या जनरल डब्यातील प्रवास तापदायक ठरतो. हाऊसफुल्ल होणारे प्रवासी पाहता राज्यराणीच्या डब्यांत वाढ करण्याची गरज आहे.
कोकण कन्या एक्स्प्रेसमध्ये कायमच आरक्षण फुल असते. सुमारे दोनशे ते चारशे वेटिंग आरक्षणाने धावणाऱ्या या गाडीवरचा लोड थांबविण्यासाठी राज्यराणी एक्स्प्रेसच्या डब्यांत वाढ करणे व दिवा पॅसेंजर ठाणे, दादर किंवा कुर्ला स्थानकांपर्यंत नेण्याचा पर्याय स्वीकारला गेला पाहिजे, अशी मागणी आहे.
जनशताब्दी, मांडवी, मत्स्यगंधा, एर्नाकुलम या गाडय़ाही आरक्षण फुल धावतात. यासाठी रेल्वे सुरू झाल्यापासून कोकणच्या चाकरमानी वर्गाला रेल्वेच्या खडतर प्रवासाचे बसलेले चटके पाहता लोकप्रतिनिधी जागरूक नसल्याने अनेक गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे.
सावंतवाडी व मडुरा टर्मिनसचा वाद कायमच पुढे येतो, पण रेल्वे गाडय़ाच्या प्रवाशांच्या गैरसोयींकडे कोणी पाहात नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. कोकण रेल्वेच्या या खडतर प्रवासामुळे कोकण रेल्वेत कोकणपण नसल्याचे बोलले जात आहे.
रेल्वेमार्ग दुपदरी व्हावा, महत्त्वाच्या रेल्वे स्थानकावर छप्पर व्हावे, सर्व रेल्वे स्थानकांवर इंटरनेट आरक्षणाची सुविधा मिळावी, अशी मागणी आहे.
कोकण रेल्वेचा प्रवास सुकर व्हावा!
लोकमान्य टिळक टर्मिनसच्या नव्या प्रकल्पाचा अर्पण सोहळा पार पाडला आहे. या टर्मिनसपर्यंत सावंतवाडी ते दिवा गाडी नेण्यात यावी तसेच राज्यराणी रेल्वेच्या डब्यांत वाढ करून तेवीस करावेत अशी मागणी आहे. कोकणात येणाऱ्या मुंबईकर चाकरमानी व पर्यटकांना रेल्वेच्या प्रवासात अनेक विघ्ने येत आहेत.
First published on: 07-12-2012 at 05:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkan railway travel should be safe and easy