सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भोगवे बीचवरती एक नवं निशाण फडकणार आहे. ते म्हणजे अत्यंत मानाच मानांकन असलेले “ब्ल्यू फ्लॅग.”
केंद्र सरकारच्या पर्यावरण व वनविभागाने अलिकडेच भोगवे बीचला हे मानांकन मिळाल्याचं जाहीर केले. असे स्टेटस मिळवणारा भोगवे हा महाराष्ट्रातील पहिला बीच आहे. अशाप्रकारे भारतातील एकूण तेरा समुद्रकिनाऱ्यांची निवड ब्ल्यू फ्लॅग फडकवण्यासाठी करण्यात आलेली आहे. भोगवे समुद्रकिनारा हा पर्यटन जिल्हा म्हणून घोषित झालेल्या सिंधुदुर्गमधल्या वेंगुर्ला तालुक्यात आहे.
ब्ल्यू फ्लॅग स्टेटस हे पर्यावरण, मॅनेजमेंट व पाण्याची गुणवत्ता याबाबतच्या अत्यंत कठोर अशा मानकांनना अनुसरूनच देण्यात येते. भोगवे किनारपट्टीला ब्ल्यू फ्लॅग मानांकन मिळाल्यामुळे इथे अर्थातच पर्यटक, यातही पुन्हा परदेशी पाहुणे यांचा ओघ वाढेल. वॉटर स्पोर्ट्स, प्रशिक्षित लाईफगार्ड्स, प्रथमोपचार साहित्य, व एकूणच सुरक्षा व गुणवत्ता यामुळे एकूणच तिथे पर्यटकांना एक वेगळा अनुभव मिळेल.
कोपनहेगन येथील फाउंडेशन फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन अर्थात FEE यांच्याकडून ब्ल्यू फ्लॅग मानांकन देण्यात येते. यात कुठल्याही बीच किंवा सागरतटाला चार मानक व त्यातील 33 क्रायटेरियाप्रमाणे तोलण्यात येतं. 1985 मध्ये फ्रान्समधून सुरुवात झालेले ब्ल्यू फ्लॅग मानांकन 1987 पासून युरोपात, 2001 पासून युरोपच्या बाहेरील टापूमध्ये कार्यन्वित आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील बहात्तर बीचपैकी तीन बीच, म्हणजेच भोगवे, चिवला व आरवली (सागर तीर्थ) यांचा विचार ब्ल्यू फ्लॅगसाठी करण्यात आला होता. शेवटी निवड झाली ती भोगवे बीचची. या प्रकल्पाचा खर्च केंद्र सरकारकडून करण्यात आला तर पाण्याची गुणवत्ता तपासणी (पाणी हे या प्रकल्पामध्ये फार महत्त्वाचं मानक आहे) व निर्मल सागरतट अभियानाची अंमलबजावणी ही महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डातर्फे करण्यात आली.
या ब्ल्यू फ्लॅग मानांकनामुळे सिंधुदुर्ग व कोकणात येणाऱ्या पर्यटकांचा ओघ नक्कीच वाढेल, असे या अधिकाऱ्याने सांगितले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात तयार झालेल्या परुळे चिपी विमानतळामुळे इथे लोक विमानाने येऊ शकतील. सध्या सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे रोड कंनेक्टिविटी सुद्धा खूप सुधारेल.
हे स्टेटस मिळवण्यासाठी काय आहेत नियम?
ब्ल्यू फ्लॅग स्टेटस मिळवण्यासाठी एखाद्या बीचला काही कठोर अशा मानकांनाअधीन राहून अर्ज करावा लागतो. उदाहरणार्थ, पाण्याची उत्तम गुणवत्ता, समुद्राच्या पाण्यात आंघोळ करता येण्याइतकी त्याची उत्कृष्ट क्वालिटी, कुठल्याही कारखाना व घाण पाण्याचा विसर्ग नसणे, बीच मॅनेजमेंट कमिटीची स्थापना, टॉयलेट व रेस्ट रूम, प्रथमोपचार साहित्य, अचानक उद्भवणाऱ्या प्रदूषणामुळे उभ्या राहणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्लॅन. ब्ल्यू फ्लॅग बाबत माहिती देणारे बोर्डसुद्धा येथे लावण्यात येतील. भोगवे बीच येथे वाटर स्पोर्ट्स, गाड्यांसाठी पार्किंग, चेंजिंग रूम, रेस्तराँ, मशीनच्या आधारे बीची साफ सफाई अशा गोष्टीसुद्धा असतील.