सोलापूर : नातवाचा सोन्याचा बदाम घेतल्यानंतर परत न दिल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणात वडिलांनी तरुण मुलाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना बार्शी तालुक्यातील कोरफळे येथे घडली. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, संशयित हल्लेखोर वृद्धाला अटक करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोमनाथ किरण ठाकरे (वय २३) असे खून झालेल्याचे नाव आहे. त्याचे वडील किरण गोविंद ठाकरे (वय ५७) यांना पोलिसांनी अटक केली आहे. मृत सोमनाथ यांची पत्नी स्वाती ठाकरे (वय १९) हिने याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार मृत सोमनाथ व त्यांचे वडील किरण ठाकरे दोघेही बांधकाम मजूर म्हणून काम करीत होते. दोघांनाही दारूचे व्यसन असल्याने अधुनमधून त्यांच्यात भांडणे होत असत.

किरण याने आपल्या नातवाच्या गळ्यातील सोन्याचा बदाम काढून नेला होता. दरम्यान, वाहनांच्या कर्जाचा थकीत हप्ता भरण्यासाठी पैसे नसल्याने सोमनाथ याने मुलाचा सोन्याचा बदाम पत्नी स्वाती हिला मागितला. तेव्हा तिने बदाम सासरा यांनी नेल्याचे सांगितले असता सोमनाथ याने वडिलांना घेतलेला सोन्याचा बदाम परत मागितला. त्यावरून दोघांत भांडण झाले. त्यावेळी मुलाने वडिलांना उचलून जमिनीवर आपटले. त्यामुळे रागाच्या भरात वडिलांनी मुलाचे डोके दगडाने ठेचले. यात गंभीर जखमी होऊन त्याचा मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.