डॉ. भालचंद्र नेमाडे यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवयच आहे. त्यांनी केलेली विधाने बौद्धिक कसोटीवर नीट तपासूनच घेतली पाहिजेत, अशा शब्दांमध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नेमाडे यांच्यावर बुधवारी नेम साधला. साहित्य संमेलनात वाद हे झालेच पाहिजे व त्यातून काहीतरी चांगले पुढे आले पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी डॉ. नेमाडे यांनी संमेलनासंदर्भात व कथा वाङ्मय प्रकाराबाबत विधाने केली होती. साहित्य संमेलन ही सूज असून, ती बंद करायला हवीत. त्याचप्रमाणे कथा हा क्षुद्र वाङ्मय प्रकार असल्याची विधाने नेमाडे यांनी केली होती. या विधानांबाबत कोत्तापल्ले यांना विचारले असता, त्यांनी या विधानांचा समाचार घेतला. कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘नेमाडे यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवय आहे. जगभरातील मोठय़ा लेखकांनी कथा लिहिल्या, हे नेमाडे विसरत आहेत. जातीव्यवस्था चांगली, जातीयवाद वाईट, असेही नेमाडे म्हणतात. नेमाडे यांनी अशी विधाने बौद्धिक कसोटीवर तपासून घेतली पाहिजे. संमेलने बंद करण्याबाबतच्या वक्तव्यावर कोत्तापल्ले म्हणाले, ‘‘संमेलने बंद करायची असतील, तर खुशाल करा. पण, संमेलन हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाची घटना आहे. मराठी समाजाचे ते वैशिष्टय़ आहे. साहित्यबाह्य़ कारणांनी संमेलने गाजतात, पण ती कारणे सांस्कृतिक जीवनातील असतात. त्यामुळे वाद-विवाद झालेच पाहिजेत. त्यातून काही चांगले निष्पन्न होते. विचारकलहाला घाबरून चालणार नाही.’’
कोत्तापल्लेंनी साधला नेमाडेंवर नेम!
डॉ. भालचंद्र नेमाडे यांना सनसनाटी निर्माण करण्याची सवयच आहे. त्यांनी केलेली विधाने बौद्धिक कसोटीवर नीट तपासूनच घेतली पाहिजेत, अशा शब्दांमध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी नेमाडे यांच्यावर बुधवारी नेम साधला.
First published on: 14-03-2013 at 04:41 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kottapalle targets on nemade