महाराष्ट्रासाठी जीवनदायी असणारे कोयना धरण शनिवारी पहाटे पूर्ण भरले. आज सकाळी ७ वाजल्यापासून धरणातून १६,२४५ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
राज्यात यंदा पावसास उशिरा सुरुवात झाली. जूनचा संपूर्ण आणि जुलैचे काही दिवस कोरडे गेल्याने यंदा कोयना धरण भरेल की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. वीजनिर्मिती आणि सिंचनासाठी या धरणातील जलसाठा महाराष्ट्रासाठी खूपच महत्वाचा असल्याने सगळय़ांचेच लक्ष कोयनेकडे लागलेले होते. सर्वसाधारण १५ ऑगस्टला भरणारे हे धरण या खेपेस सुमारे ३ आठवडे उशिरा भरले. आज सकाळी ७ वाजल्यापासून धरणाचे ६ वक्र दरवाजे दीड फुटांवर उचलून कोयना नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. दरवाजातून १४,१३४ तर, पायथा वीजगृहातून २,१११ असे एकूण १६,२४५ क्युसेक पाणी कोयना नदीत मिसळत आहे. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत अंशत: वाढ होणार असून, तूर्तासतरी पुराचा धोका संभवत नाही.
गतवर्षी १७ जुलला दुपारी कोयना धरणाचे दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग करणे अपरिहार्य बनले होते. यंदा मात्र, पावसाची सुरूवात निराशाजनक झाली. मात्र, प्रारंभीचा सव्वा महिना कोरडा गेल्यानंतर झालेल्या समाधानकारक पावसाने खरीप हंगामाला जीवदान मिळताना, ठिकठिकाणचे पाणी साठवण प्रकल्प भरून वाहिले. परंतु, त्यात कोयना शिवसागर पूर्ण भरण्यास विलंबच लागला. आज सकाळी १०५.२५ टीएमसी क्षमतेच्या कोयना जलाशयाची जलपातळी २,१६३ फूट १ इंच तर, पाणीसाठा १०४.७१ (९९.४८) टक्के असताना, धरणाचे सर्व सहाही वक्र दरवाजे दीड फुटांवर उचलून कोयना नदीत १४,१३४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यास सुरूवात करण्यात आली. तर, पायथा वीजगृहातून २,१११ क्युसेक पाणी कोयना नदीत मिसळत आहे. दरम्यान, धरणातून विसर्ग करण्यात येणाऱ्या पाण्यापेक्षाही धरणात आवक होणाऱ्या पाण्याचे प्रमाण अधिक असल्याने धरणाचा पाणीसाठा ०.२१ टीएमसीने आज दिवसभरात वाढला आहे. सध्या कोयना धरणात २२,८६३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे कृष्णा-कोयना नद्यांची पाणीपातळी अंशत:च वाढणार असल्याने त्याचा नदीकाठावर परिणाम दिसून येणार नाही. तूर्तासतरी पुराची शक्यता राहणार नसली,तरी नदीकाठी दक्षतेचे आदेश जारी आहेत.