कराड : पश्चिम घाटासह कोयना पाणलोटात गेल्या सहा- सात दिवसांपासून सलग सुरु असलेल्या पावसाचा जोर कायम असून, १०५.२५ अब्ज घनफूट (टीएमसी) क्षमतेचा कोयना शिवसागराचा जलसाठा ६२ टक्क्यांच्या जवळपास असताना धरण्याच्या पायथा वीज गृहातील दोनपैकी एक यंत्रणा सुरु करून कोयना नदीपात्रात आज मंगळवारी सकाळी १० वाजल्यापासून प्रतिसेकंद १,०५० क्युसेक (२९,७३६ लिटर) पाणी सोडण्यात येत आहे.
कोयना सिंचन प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, धरण परिचालन सूचीनुसार पावसाळा हंगामात किती तारखेला किती पाणी साठवण असावी हे निश्चित आहे. त्यानुसार कोयना धरणाच्या पायथा वीज गृहाच्या दोन पैकी एक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. हा सर्वसाधारण विसर्ग आहे. धरणाच्या दरवाजातून हा विसर्ग करण्यात आला नसल्याचे लोकांनी समजून घ्यावे. पावसाळ्याचा उर्वरित कालावधीत विचारात घेवून हा अल्पसा जलविसर्ग सुरु करण्यात आल्याचे म्हणण्यास हरकत नाही, तरीही खबरदारी म्हणून कोयना-कृष्णा नद्यांकाठी दक्षतेच्या सूचना देण्यात आल्याचे संबंधित सूत्रांनी स्पष्ट केले आहे. सध्या कोयना धरणाचा जलसाठा ६२ टक्क्यांच्या समीप असून, त्यात ४७,६९३ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. गेल्या तीन दिवसात दररोज सरासरी पाच अब्ज घनफूट (टीएमसी) पाण्याची धरणात घसघशीत आवक होत आहे.
हेही वाचा…वृध्दाश्रमात वृध्दाचे निधन; पित्याच्या अंत्यदर्शनासाठीही मुलगा आला नाही
आठवड्याभरातील पावसाने जलचित्र पालटले असून, कोयना धरणतर बघता- बघता दोनतृतीयांश भरण्याच्या मार्गावर असताना, धरण्याच्या पायथा वीज गृहाच्या एका यंत्रणेतून वीज निर्मिती सुरु झाली आहे. लवकरच दुसरी यंत्रणा सुरु होण्याची शक्यता असून, तुलनेत कोयना शिवसागराचा जलसाठा अतिशय मजबूत स्थिती आहे. अशीच अनेक मध्यम व मोठ्या धरणांची समाधानकारक स्थिती असून बहुतेक छोटे जलसाठे भरून वाहताने नद्यांना पूर येण्याची चिंता व्यक्त होवू लागली आहे.