कोयना धरणक्षेत्रासह त्याखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी गेल्या १४ दिवसांत संततधार पाऊस कोसळला असला तरी, हा पाऊस सरासरीच्या तुलनेत २५ टक्क्याने कमीच असून, गतवर्षीच्या तुलनेत निम्माच आहे. जून महिना पुरता कोरडा गेल्याने सध्या बक्कळ पाऊस होऊनही कोयना धरणाचा पाणीसाठा बेताचाच आहे. दरम्यान, कोयना जलविद्युत प्रकल्पातून क्षमतेने वीजनिर्मिती सुरू आहे. सध्या आणखी पावसाची गरज असताना सर्वत्र पावसाचा जोर ओसरला आहे.  
सध्या कोयना जलाशयाची पाणीपातळी २,००१ फूट असून, पाणीसाठा ४४.७९ टीएमसी म्हणजेच ४२.६५ टक्के नोंदला गेला आहे. गतवर्षी आजमितीला कोयना धरणातून पाणी सोडण्यात येत होते, तर कोयना धरणाचा पाणीसाठा ८८.७५ टीएमसी म्हणजे ८५ टक्के होता.
गेल्या १४ दिवसांतील सततच्या जोमदार पावसामुळे कोयना धरणासह सर्वच पाणी साठवण प्रकल्पांची स्थिती निश्चितच बेताची आहे. प्रमुख प्रकल्पांचा पाणीसाठा टीएमसीमध्ये असा, कंसात टक्केवारी- कोयना ४४.७९ (४२.६५), वारणा २५.४४ (७४), धोम ५.८८ (४३.५७), धोम बलकवडी २.१४ (५४), उरमोडी ७ (७२.५८), कण्हेर ५.७३ (६१.६६), दूधगंगा १८.८२ (५१), राधानगरी ६.६३ (७९), तारळी ५.०९ (८७.१४), उत्तरमांड ०.५३३ (६१.४०), मोरणा ०.९५४ (७३.०६).
आज दिवसभरात कोयना धरणक्षेत्रातील नवजा विभागात सर्वाधिक १०० मि.मी. (एकूण २,५८७ मि.मी.) कोयनानगर विभागात ४८ मि.मी. (एकूण २,२४०) तर, महाबळेश्वर विभागात १४ मि.मी. (एकूण १,९६३ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे. हा सरासरी पाऊस २,२६३.३३ मि.मी. आहे. गतवर्षी हाच सरासरी पाऊस ३,६०२.३३ मि.मी. नोंदला गेला होता. तर, धरणक्षेत्रातील नवजा विभागात सर्वाधिक ४,००९ मि.मी. तर, महाबळेश्वर विभागात ३,५९० व कोयनानगर विभागात ३,२०८ मि.मी. पावसाची नोंद झाली होती. सध्या गेल्या १५ दिवसांतील पावसाने कोयना जलाशयाची पाणीपातळी ६६ फुटाने वाढून २,१०१ फूट आहे. गतवर्षी हीच पाणीपातळी २,०५१ फूट नोंदली गेली होती. तर, धरणातून मोठय़ा प्रमाणात पाणी सोडण्यात येताना, धरणाचा पाणीसाठा ८८.७५ टीएमसी होता. सध्या कोयना जलाशय शिगोशिग भरण्यासाठी अजून ६१ टीएमसी पाण्याची गरज आहे. दरम्यानच्या वीजनिर्मितीचा विचार करता, धरणात सुमारे ७०टीएमसी पाण्याची आवक होणे क्रमप्राप्त आहे. आज सकाळी ८ वाजेपर्यंत गेल्या २४ तासांत पाटण तालुक्यात सरासरी १०५.३३ एकूण ८१० तसेच, कराड तालुक्यात ४१.७० एकूण २६०.९७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. कराडनजीकचा खोडशी वळण बंधारा पाण्याखाली असून, कृष्णा, कोयना नद्या दुथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, संगमनगर धक्का पुलासह कमी उंचीचे सर्वच पूल पाण्याखाली असल्याने सुमारे ५५ गावे व वाडय़ावस्त्या संपर्कहीन आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा