महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळय़ाबरोबर कोयना पर्यटनही पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. पाटण तालुक्यात पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे असून, या स्थळांना भेटी देणे पर्यटकांना सोपस्कार जावे, यासाठी कोयना पर्यटन पुस्तक प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक पर्यटकांना दिशादर्शक ठरेल असा विश्वास राज्याचे माजी पर्यटनमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी व्यक्त केला. जागतिक पातळीवर पर्यटन व्यवसाय आर्थिक उन्नतीसाठी महत्त्वाचे साधन होत असून, त्यातून या पर्यटन स्थळांचा सर्वागीण विकास साधला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पाटणच्या रणजितसिंह पाटणकर स्मारक मंदिरामध्ये विक्रमसिंह पाटणकर, निसर्गमित्र व छायाचित्रकार विजयकुमार हरिश्चंद्रे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विक्रमबाबा पाटणकर यांच्या हस्ते कोयना पर्यटन या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले त्या प्रसंगीत ते बोलत होते. ग्रंथपाल संजय इंगवले उपस्थित होते. या वेळी विजयकुमार हरिश्चंद्रे यांना पाटणकरांच्या हस्ते कोयना निसर्गमित्र पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
विक्रमसिंह पाटणकर म्हणाले, की हा तालुका निसर्गसौंदर्याच्या कुशीत असून, त्यास नैसर्गिक व ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. राज्यातील इतर काही थंड हवेच्या ठिकाणाबरोबर पाटण तालुकाही मागे नाही. ब्रिटिशांनी जी काही ठिकाणे नावारूपास आणली तीच आज प्रसिद्धीच्या झोतात आहेत. या ठिकाणांना तोडीस तोड म्हणून या तालुक्यात अनेक पर्यटनाची स्थळे आहेत. याचा प्रत्यय द्यायचा म्हटले तर जेजुरी येथील बहुसंख्य निसर्गप्रेमी पर्यटकांनी गेली आठ वष्रे या तालुक्यातील सह्याद्रीच्या काऊदऱ्यावर निसर्गपूजा सुरू केली आहे. संपूर्ण देशात केवळ पाटण तालुक्यातच निसर्गपूजा होत आहे. यावरून पाटण तालुक्यातच निसर्गाचे मोठेपण लक्षात येते. येथील निसर्गप्रेमींनी तालुक्यातील निसर्ग, ऐतिहासिक व धार्मिक स्थळांचा अभ्यास करून कोयना पर्यटन हे पुस्तक पर्यटकांच्या मार्गदर्शनासाठी तयार केले आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. या पुस्तकांच्या माध्यमातून लोकांना पाटण तालुक्यातील सौंदर्याचे दर्शन होणार आहे.
विजयकुमार हरिश्चंद्रे म्हणाले, की मी निसर्ग छायाचित्रांसाठी देशभर भ्रमंती केली. यामध्ये निसर्ग पर्यटनाची अनेक सौंदर्य पाहिली, मात्र पाटण तालुक्यात निसर्गाचा खजिना आहे. या तालुक्यात निसर्गाची अशी ठिकाणे आहेत की जी ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या स्थळांपेक्षा अनेक पटीने सुंदर आहेत. देशात फक्त याच तालुक्यातील काऊदऱ्यावर गेली आठ वष्रे निसर्गपूजा केली जाते. येथील निसर्ग खऱ्याअर्थाने जगभरातील पर्यटकांसमोर आणण्याची गरज आहे. तरच महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळय़ासारखे पाटण तालुक्याचे रूपडे बदलून जाईल.
‘महाबळेश्वर, माथेरान, लोणावळय़ाबरोबर कोयना पर्यटनही पर्यटकांच्या पसंतीस’
महाबळेश्वर, पाचगणी, माथेरान, लोणावळय़ाबरोबर कोयना पर्यटनही पर्यटकांच्या पसंतीस उतरले आहे. पाटण तालुक्यात पर्यटनासाठी अनेक नैसर्गिक, ऐतिहासिक, धार्मिक ठिकाणे असून, या स्थळांना भेटी देणे पर्यटकांना सोपस्कार जावे, यासाठी कोयना पर्यटन पुस्तक प्रकाशित झाले आहे.
आणखी वाचा
First published on: 09-05-2015 at 03:30 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Koyna tourism is travelers choice like mahabaleshwar matheran lonavala