कराड बाजार समितीतर्फे पुढील वर्षापासून यशवंत कृषी प्रदर्शनात १ लाख रु., मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असे स्वरूप असलेला यशवंत कृषिभूषण पुरस्कार देण्यात येणार आहे. प्रयोगशील शेतीला प्रोत्साहन मिळावे म्हणून ज्येष्ठ नेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने हा राज्यस्तरीय पुरस्कार सुरू करण्यात येत असल्याची माहिती माजी सहकारमंत्री विलासकाका उंडाळकर यांनी दिली.
१२ व्या यशवंतराव चव्हाण कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाच्या समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, जिल्हा कृषी अधीक्षक जितेंद्र शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर कोळी उपस्थित होते.
उंडाळकर म्हणाले, की प्रदर्शनामुळे महाराष्ट्रात क्रांती घडली आहे. आजही देशातील ६५ टक्के जनता शेतीवर अवलंबून आहे. या प्रदर्शनाचे खास वैशिष्टय़ म्हणजे या प्रदर्शनास तरूण शेतकऱ्यांनी मोठय़ा संख्येने सहभाग घेतला. प्रदर्शनातील सहभागामुळे त्यांच्या कर्तृत्वाला चालना मिळाली. दिवंगत यशवंतराव चव्हाण यांचेही शेतीतील कार्य फार मोठे आहे. म्हणून यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुढील वर्षांपासून राज्यातील यशस्वी शेतकऱ्यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार देण्याचा निर्णय कराड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने घेण्यात आला आहे.
अश्विन मुद्गल म्हणाले, की याच विभागातील तासगाव येथून वि. स. पागे यांनी रोजगार हमी योजना सुरू केली. ती आज परदेशातही राबवली जाते. येथील प्रदर्शनाने शेतीतील गुणात्मक बदलासाठी मार्गदर्शकाची भूमिका बजावली आहे. मात्र, वातावरणातील बदलांप्रमाणेच शेतीसमोरील आव्हानेही बदलत चालली असल्याने शेती व जलसाक्षरता गरजेची असून, शेतक-याने शेतीचे सर्वागाने ज्ञान घ्यावे, अभ्यासक बनावे. कमी पाण्यावर, मर्यादित क्षेत्रावर सकस व भरघोस उत्पन्न घ्यावे असे आव्हान त्यांनी केले. जलयुक्त शिवार अभियानाला विलासकाकांनी कित्येक वर्षांपूर्वीच सुरूवात केली असून, त्याचे मोठे मॉडेल पहायचे असल्यास दक्षिण मांड नदीवरील प्रकल्पाचे उदाहरण द्यावे लागेल. येथे २ हजार कोटी रूपये किमतीचा प्रकल्प अगदी अत्यल्प खर्चात उभारला गेला असून, सुमारे अडीच टीएमसी पाणी त्यात अडवले गेले असल्याचे मुद्गल म्हणाले. प्रदर्शनाला सुमारे १२ लाख शेतकऱ्यांनी भेट दिली आहे. आता, या प्रदर्शनाच्या माध्यमातून सूक्ष्मसिंचन, क्षारपड जमिनीचा प्रश्न, सेंद्रिय शेती याला महत्त्व दिले जावे. प्रदर्शनातील १० स्पर्धामधून शेतीशी निगडित सर्व घटकांना स्पर्श झाल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले. नितीन पाटील, जितेंद्र शिंदे यांनी मनोगत व्यक्त केले. आभार वसंतराव जगदाळे यांनी मानले.

Story img Loader