कित्येक वर्षांपासून प्रशासनाचे दुर्लक्षच

सह्य़ाद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून वाहत येणारी कृष्णा आज प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून नदीतील जलचर पाण्यातील प्राणवायू संपुष्टात येत असल्याने मृत्युमुखी पडत आहेत. रविवारी हजारो माशांचा तवंग नदीपात्रात आढळला. हेच पाणी सांगलीकर गेल्या कित्येक वर्षांपासून पचवत आले आहेत. याची ना कुणाला खंत ना कुणा खेद. स्वतला वाचविण्यासाठी काही मंडळी आरओ पाणी पीत असली तरी सर्वसामान्यांचे काय? असा प्रश्न ना प्रदूषण नियंत्रण मंडळाला ना महापालिकेच्या प्रशासनाला.

सांगली व कुपवाड या दोन शहरांना कृष्णा नदीतून पाणीपुरवठा केला जातो. तसेच याचबरोबर या नदीकाठी असलेल्या काही गावांनाही याच नदीचा आधार आहे. निम्मा जिल्हा कृष्णा-वारणेचे पाणी पीत आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. मात्र, ग्रामीण भागात आजही पाण्याचे अन्य स्रोत असले तरी घरी येणाऱ्या पाण्याचा पीएच व्हॅल्यू काढला तर हे आपण पाणी पचवू कसे शकतो हेच आठवे आश्चर्य ठरावे अशी स्थिती आहे.

कृष्णा नदीमध्ये नदीकाठच्या १६० गावांचे सांडपाणी सोडण्यात येते. यामध्ये इस्लामपूर नगर परिषदेचाही समावेश आहे. दररोज सुमारे ३०.३५ दशलक्ष लिटर सांडपाणी घेऊन ही नदी सांगलीत येते. सांगलीत येताच यामध्ये सांगली, कुपवाड आणि औद्योगिक वसाहतीतील कारखान्यातून बाहेर पडणारे रासायनिक टाकावू पाणी मिसळते. हे तब्बल ५६.२५ लाख लिटर आहे. यामुळे कृष्णेची आज गटारगंगा झाली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. यावर उतारा म्हणून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. या सोडलेल्या पाण्याबरोबर नदीतील प्रदूषित पाणी वाहून जाण्याची क्रिया केली जाते. यामुळे धरणातील पाणी वाया जाते याचा हिशोबच कोणी करीत नाही. अस्वच्छ नदी स्वच्छ करण्यासाठी कोयनेचा वापर करण्याऐवजी त्याचा वापर दुष्काळातील जनतेची तहान भागविण्यासाठी होऊ शकतो, याची जाणीव कोण करून देणार हा प्रश्न आहे.

शहराच्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाला अधिकारच असले तरी त्याचा वापर करूनही ढिम्म झालेले प्रशासन करीत नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दरवर्षी महापालिकेला कोटींचा दंड ठोठावला जातो. ५ कोटींची अनामतही जप्त करण्यात आली आहे. जलसंपदा विभागानेही नदी प्रदूषणाच्या कारणावरून महापालिकेला एक कोटी २५ लाखाचा दंड केला आहे. तरीसुद्धा दंड भरूनही प्रश्न सोडविण्याची इच्छाशक्ती मात्र दाखविली जात नाही.

प्रदूषण नियंत्रण मंडळ केवळ महापालिकेवरच दंडात्मक कारवाई करते, मात्र, नदी प्रदूषण करणारी इस्लामपूर नगरपालिका, नदीत पाणी सोडणारे साखर कारखाने, आणि १७० गावे यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. केवळ नोटिसा देण्याची औपचारिकता पार पाडली जाते. नदी मली करण्याची प्रक्रियाही तशीच अव्याहतपणे सुरू राहते. आíकटेक्ट रवींद्र चव्हाण यांनी वसंतनगर आणि कुपवाड येथे दररोज येणाऱ्या नळातील पाण्याची खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता पाण्यामध्ये ई-कोलम आढळून आले. यामुळे हे पाणी सजीव प्राण्यांना पिण्यायोग्य असत नाही. पिण्याच्या पाण्यामध्ये क्लोरिनचे प्रमाण ०.२ पीपीएम असणे आवश्यक असताना नळाच्या पाण्यात ते आढळतच नसल्याचेही या अहवालावरून स्पष्ट होत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. पाण्यात मानवी मलमूत्र आणि शेवाळही आढळून येत असून हे पाणी पिण्यास अयोग्य आहेच, पण विविध जलजन्य आजारांना आमंत्रित करणारे ठरते.

महापालिका क्षेत्रामध्ये सांगली व कुपवाडमध्ये पाण्याचे ग्राहक ५२ हजार आहेत. दररोज माणसी १३५ लिटर या मागणीनुसार दररोज ७ कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा पाणीपुरवठा विभागाकडून शहरवासीयांना केला जातो. मात्र, नदीत रोज मिसळले जाणारे सांडपाणीच पाच कोटी ६०लाख लिटर आहे. याशिवाय औद्योगिक वसाहतीतून एक कोटी लिटर दूषित पाणी सोडण्यात येते. नदीपात्रात थेट सांडपाणी मिसळू नये यासाठी नाल्यातील पाणी शेतीला देण्यासाठी योजना महापालिकेने धुळगाव योजनेअंतर्गत हाती घेतली. मात्र, आज एकूण सांडपाण्यापकी २० टक्केच पाणी उचलून धुळगावला देण्यात येते. तेथेही या दूषित पाण्यावर प्रक्रिया केली जात नसल्याने भूगर्भातील पाण्याचे साठे दूषित झाले आहेत. या योजनेवर अद्याप दोन कोटींचा खर्च करणे गरजेचे आहे.

जलचरांचे अस्तित्व धोक्यात

कृष्णा नदीमध्ये वसंतदादा समाधिस्थळापासून जवळच असलेला शेरीनाला, आयर्वनि पूलाजवळ दक्षिण घाट, सांगलीवाडी आणि शंभरफुटी रोडवरून येणारा हरिपूर मार्गावरील नाला यामार्गाने दूषित पाणी सोडले जाते. यापकी केवळ शेरीनाल्यावर धुळगाव योजना असुन अन्य ठिकाणचे ८०टक्के सांडपाणी तसेच नदीपात्रात सोडण्यात येते. याशिवाय नदीकाठच्या गावातील सांडपाणीही या नदीत कोणतीही प्रक्रिया न करता सोडण्यात येते. याचा परिणाम म्हणून जलचराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. औद्योगिक कारखान्यातून बाहेर टाकले जाणारे पाणी रसायन युक्त असते, तसेच सांडपाणी यामुळे पाण्यातील सजीवांना आवश्यक असलेले बॅक्टिरियांचा नाश होतो. तसेच प्राणवायूचेही विघटन झाल्याने आवश्यक प्राणवायूच उपलब्ध होत नसल्याने मासे मृत्युमुखी पडण्याचे प्रकार घडत आहेत.

  • महापालिकेतील पाण्याची ग्राहक संख्या- ५२ हजार
  • प्रतिदिन माणसी केला जाणारा पाणी पुरवठा- १३५ लिटर
  • दररोज आवश्यक पाणी- ७ कोटी २० लाख लिटर
  • दररोज नदीत मिसळणारे सांडपाणी – ५ कोटी ६० लाख लिटर.
  • औद्योगिक क्षेत्रातील कारखान्यात मिसळण्यात येणारे रसायनयुक्त पाणी- एक कोटी लिटर.

Story img Loader