वैद्यकशास्त्रातील शिक्षणतज्ज्ञ आणि उत्कृष्ट प्रशासक म्हणून ख्यातनाम असणाऱ्या डॉ. निलीमा मलिक या भारतात अभिमत विद्यापीठाच्या कुलगुरूपदी विराजमान होणाऱ्या दंतवैद्यक शास्त्रातील पहिल्या महिला ठरल्या असून, कृष्णा वैद्यकीय विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या नूतन कुलगुरू म्हणून त्यांनी गुरूवारी विद्यापीठाचे कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला.
डॉ. मलिक यांच्या स्वागतासाठी व मावळते कुलगुरू डॉ. ए. व्ही. नाडकर्णी यांना निरोप देण्यासाठी कृष्णा विद्यापीठात समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. कुलपती डॉ. वेदप्रकाश मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे, कृष्णा विद्यापीठाच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य शिवाजीराव मोहिते, विनायक भोसले, वित्त अधिकारी पी. डी. जॉन यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. कुलपती डॉ.मिश्रा यांच्या हस्ते नूतन कुलगुरू डॉ. मलिक व मावळते कुलगुरू डॉ. नाडकर्णी यांना शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.