लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : सांगलीकरासाठी ७ ते १२ फेब्रुवारी दरम्यान कृष्णामाई उत्सव आयोजित करण्यात आला असून, या निमित्ताने व्याख्यान, कीर्तन, महाआरती, जलपूजन, दीपोत्सव यांचे आयोजन करण्यात आले असल्याचे महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत सांगितले.

श्री. गुप्ता म्हणाले, ‘कृष्णा नदी ही सांगलीकरांची जीवनवाहिनी आहे. याची ओळख व्हावी, प्रदूषणाबाबत जनजागृती व्हावी यासाठी महापालिका, गणपती पंचायतन आणि कृष्णामाई महोत्सव समितीच्या वतीने कृष्णामाई महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. याचा प्रारंभ ७ फेब्रुवारी रोजी सांगली संस्थानचे युवराज आदित्यराजे पटवर्धन यांच्या हस्ते ध्वजारोहणाने करण्यात येणार आहे. या वेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. विशाल पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे यांच्यासह जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी हे उपस्थित राहणार आहेत.

या महोत्सवात महिला बचत गटांनाही सहभागी करून घेण्यात आले असून, त्यांनी उत्पादित केलेल्या पदार्थांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या निमित्ताने घाटाच्या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली असून, ऐतिहासिक आयर्विन पुलावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

Story img Loader