|| दिगंबर शिंदे

सांगली : पावसाचा सांगावा घेऊन थेट आफ्रिकेतून चातकाचे कृष्णातिरी आगमन झाले असून औदुंबर, आमणापूर परिसरात आगमन झाले आहे. दरवर्षी रोहिणी नक्षत्राच्या  मुहुर्तावर येणारे हे पाहुणे पक्षी यंदा सात-दहा दिवस अगोदरच आले आहेत.

आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना पाऊस येणार असल्याची वर्दी  निसर्गातील पक्षांकडून मिळत असते. कुळीव कुळीव म्हणणारी कोकीळा, शेतकऱ्यांना पेरते व्हा अशी साद घालणारा पावशा, हे नेहमीच बळीराजाला पावसाच्या आगमनासाठी सज्ज ठेवत असतात.

काळ्या पांढऱ्या चातकाच्या  डोक्यावर एखाद्या राजकुमाराचा  शोभावा असा काळा तुरा असतो. त्याचा साळुंकी एवढा आकार, लांब  शेपूट,  शरीराचा वरील सर्व भाग काळ्या रंगाचा असतो. हनुवटी, मान व पोटाचा भाग पांढरा असतो. पंखांवर रुंद पांढरा पट्टा असल्यामुळे उडतानाही हा चातकपक्षी सहज ओळखतो. शेपटीतील पिसांची टोके पांढरी असतात. डोळे तांबडे तपकिरी, चोच काळी व पाय काळसर निळे असतात. नर व मादी सारखेच दिसतात. हे एकेकटे किंवा यांची जोडी असते.

कृष्णाकाठावर  कोकीळा, पावशा, कारूण्य कोकीळा, बुलबुल, रॉबीन या गाणाऱ्या पक्षांसोबतच चातकाच्या सुरांची रानमैफल सध्या रंगते आहे. आफ्रिकेतून आलेल्या चातक पक्षाचा मुक्काम जून ते सप्टेंबर म्हणजे संपूर्ण पावसाळ्यात या परिसरात असल्याची माहिती पक्षीप्रेमी संदीप नाझरे यांनी दिली.

चातकाची वीण जूनपासून ऑगस्टपर्यंत होते. मीलन काळात हे पक्षी खूप गोंगाट करतात. कोकिळेप्रमाणे याही पक्ष्यांत भ्रूण परजीविता दिसून येते. मादी आपली अंडी छोट्या सातभाई पक्ष्याच्या घरट्यात घालते. अंडी घालण्यासाठी ती सकाळची वेळ निवडते. ती सरळ सातभाईच्या घरट्याजवळ जाते. सातभाई हा लहान पक्षी असल्यामुळे भिऊन घरट्यातून पळून जातो व काही आडकाठी न येता तिला सातभाईच्या घरट्यात अंडे घालता येते. अंड्याचा रंग सातभाईच्या अंड्याप्रमाणेच आकाशी असतो. सप्टेंबरच्या सुमारास सातभाईची पिले अंड्यांतून बाहेर येतात. त्यांमध्येच चातकाचे पिल्लू असते. आपल्या पिलांबरोबर सातभाई चातकाच्या पिलाला वाढवितात. चातकाचे पिल्लू तपकिरी रंगाचे असून त्याच्या पंखांवर पिवळसर आडवा पट्टा असतो. त्यामुळे ते सहज ओळखू येत असते.

Story img Loader