रत्नागिरी जिल्ह्यात सामूहिक केळी लागवडीचा प्रकल्प यशस्वीपणे राबवलेले कृषिभूषण रणजित खानविलकर (७३) यांचे गुरुवारी सकाळी  हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. व्यवसायाने अभियंता असलेल्या खानविलकर यांचा पेढांबे (ता. चिपळूण) येथे सीमेंट पाइप बनवण्याचा कारखाना आहे. पण त्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योगांमध्ये विशेष रुची होती. त्यामुळे त्यांनी या क्षेत्रात विधिप्रयोग केले. पेढांबे येथील तरुण शेतकऱ्यांना संघटित करून २००५ मध्ये २५ एकरावर केळीची बाग त्यांनी विकसित केली. हा प्रयोग कमालीचा यशस्वी ठरला. त्यापैकी फक्त पाच जण प्रत्यक्ष जमीन कसणारे होते, तर उरलेले सर्व जण केवळ जमिनीचे मालक होते. या शेतकऱ्यांनी अपार कष्ट घेऊन या प्रकल्पावरील ६० लाख रुपयांचे कर्ज अवघ्या अडीच वर्षांत फेडले आणि चांगला नफाही कमावला. या यशामुळे प्रेरित होऊन गेल्या सुमारे दहा वर्षांत या परिसरात अनेक शेतकऱ्यांनी केळी व अननसाची मोठय़ा प्रमाणात लागवड केली आहे.  मूळचे लांजा तालुक्यातील बेणी गावचे असलेल्या खानविलकर यांनी लांज्यात कुक्कुटपालन संस्थाही उभारली. या संस्थेचे ते माजी अध्यक्ष होते. अलीकडील काळात त्यांनी कोकणातील जलसंधारण व सिंचनाबाबतच्या प्रयोगांवर लक्ष केंद्रित केले होते. कोकण भूमी प्रतिष्ठानचे संचालक म्हणूनही ते कार्यरत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा