लोकसत्ता वार्ताहर
कर्जत : अहिल्या नगर जिल्ह्यातील कर्जत येथे रूईगव्हण पीर फाटा या परिसरामध्ये सीना धरणाकडे जाणारा कुकडीचा मुख्य कालवा काही जणांनी भराव तोडून त्यामध्ये मोठे पाईप टाकून फोडला आहे. यामुळे सीना धरणामध्ये पाणी जाण्यास अडचण निर्माण होणार असून, भराव फोडणाऱ्या नागरिकांवर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी आज कालव्यावर पाण्यामध्ये उतरून अर्ध नग्न आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील केली.
यावेळी अमोल खराडे, विकास शिरसागर, विकास खराडे, उत्तम क्षीरसागर, बलभीम खराडे, परमेश्वर शिरसागर, रावसाहेब खराडे, नितीन शिरसागर यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
कर्जत तालुक्यामध्ये कुकडीचे उन्हाळी आवर्तन सुटले आहे, या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या उन्हाळी पिकांना मोठा फायदा होणार आहे. तसेच ज्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे त्यांना काही प्रमाणामध्ये दिलासा मिळणार आहे. असे असताना तालुक्यातील रुई गव्हाण पीर फाटा परिसरामध्ये कुकडीच्या मुख्य कालव्यामधन सीना धरणामध्ये पाणी जाण्यासाठी कालवा तयार करून भोसाखिंड यामधून धरणामध्ये पाणी नेण्यात आले आहे. यासाठी सरकारने कोट्यावधी रुपये खर्च केले आहेत. सीना धरणाकडे जाणाऱ्या कालव्याला काही नागरिकांनी भराव फोडून त्यामध्ये मोठे पाईप टाकून राजरोसपणे कालव्याच्या पाण्याची चोरी केली आहे. हे पाणी पिण्याच्या पाण्यासाठी छोट्या तलावामध्ये सोडण्यात आल्याचे दाखवले असले तरी प्रत्यक्षात या तलावामधून मोठ्या प्रमाणामध्ये शेती पंप बसवून त्याद्वारे पाईपलाईनने आपल्या शेतामध्ये अनेकांनी पाणी घेऊन गेले आहेत. एवढेच नव्हे तर या मेन कालव्याच्या काही भागांमध्ये दगडाचा भराव टाकून पाणीदेखील अडवले आहे. यामुळे या पाईपलाईन मधून मोठ्या प्रमाणामध्ये पाणी खेचले जात आहे.
मात्र यामुळे भोसा गावातील शेतकरी संकटात सापडले आहे. या गावातील शेतकऱ्यांचे पूर्ण पाणी बंद झाले आहे. तसेच सीना धरणामध्ये जाणाऱ्या पाण्यात देखील मोठा अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे यावेळी सीना धरणामध्ये किती पाणी जाईल याविषयी शंका निर्माण झाली आहे. मुख्य कालव्याचा भराव राजरोसपणे फोडला व पाईप टाकून चोरी करत असल्याचे स्पष्टपणे दिसत असताना व माहिती असताना देखील पाटबंधारे कुकडी विभागाचे अधिकारी व कर्मचारी संबंधित व्यक्तींवर कोणतीही कारवाई करत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे.
अर्ध नग्न आंदोलन
यामुळे संतप्त झालेल्या भोसा गावातील सर्व शेतकऱ्यांनी ज्या ठिकाणी हा भराव फोडला आहे आणि पाईप टाकून पाणी चोरी सुरू आहे त्या परिसरामध्ये पाण्यामध्ये उतरून अर्धनग्न आंदोलन केले . यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कुकडी विभागाची अधिकारी हा सर्व प्रकार माहित असून देखील संबंधित नागरिकांवर कारवाई का करत नाही असा प्रश्न विकास शिरसागर यांनी उपस्थित केला. तसेच या प्रश्नावर कुकडी कार्यालयामध्ये जाऊन कारवाई करण्यासाठी आंदोलन करणार आहोत असा इशारा अमोल खराडे यांनी दिला आहे.