धाराशिव : महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवास ६ ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. तुळजाभवानी मंदिर समितीच्यावतीने ६ ते ३० ऑक्टोबर दरम्यान नवरात्रौत्सव कालावधीत साजर्‍या केल्या जाणार्‍या विविध धार्मिक विधीचे वेळापत्रक बुधवारी जाहीर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांच्या उपस्थितीत जिल्हा प्रशासनातील अधिकारी आणि पुजारी मंडळांचे पदाधिकारी यांची महत्वपूर्ण बैठकही बुधवारी आयोजित करण्यात आली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> पद्मश्री अरविंद गुप्ता यांची प्राज्ञपाठशाळा मंडळाच्या कार्यालयात भेट

साडेतीन शक्तिपीठापैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी मंदिर प्रशासनाने सुरू केली आहे. बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत यंदाच्या नवरात्र महोत्सवातील विविध कार्यक्रमांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ६ ऑक्टोबरपासून तुळजाभवानी देवीच्या नवरात्र महोत्सवास प्रारंभ होत आहे. ६ ऑक्टोबर रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होणार आहे. १५ ऑक्टोबर रोजी मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. १६ ते २२ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे. या कालावधीत मंदिर परिसरात दररोज तुळजाभवानी देवीचा छबीना मिरवणुकीचा धार्मिक विधी पार पडणार आहे.

हेही वाचा >>> “याचा अर्थ फडणवीसांनी मान्य केलं की, संभाजी भिडेंना त्यांनीच…”, भास्कर जाधवांचं थेट वक्तव्य

२३  ऑक्टोबर रोजी दुपारी होमकुंडावर अजाबळीचा धार्मिक विधी आणि त्यानंतर घटोत्थापनाने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. त्याचदिवशी रात्री पलंग पालखी मिरवणूक आणि २४  ऑक्टोबरला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन कुंकवाची उधळण करीत मोठ्या उत्साहात केले जाणार आहे. सिमोल्लंघनानंतर देवीची श्रमनिद्रा सुरू होईल. २८  ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि २९  ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची पुन्हा एकदा सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. त्याचदिवशी रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबीना मिरवणूक, जोगवा व विविध धार्मिक विधी पार पडतील. ३० ऑक्टोबर रोजी नित्योपचार पूजा व रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबीना मिरवणुकीने शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kulswamini tuljabhavani devi shardiya navratri festival start from october 6 zws