सिंहस्थ कुंभमेळा उंबरठय़ावर येऊन ठेपला असताना अजूनही साधुग्रामसाठी जागा निश्चित होत नसल्याने पर्यायी जागांचा शोध आणि साधू, महंतांसह पाहणीचा उपक्रम रविवारीही प्रशासनाच्या वतीने सुरूच ठेवण्यात आला. जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त व इतर प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास यांच्यासह साधुग्रामची पर्यायी जागा आणि पर्यायी शाही मार्गाचीही पाहणी केली.
सिंहस्थाच्या तयारीत इतक्या दिवसांपासून संथपणे हालचाल करणाऱ्या प्रशासनाने आणि महापालिकेने आता हालचाली वाढविल्या असल्या तरी अनेक प्रश्नांचा गुंता अजूनही सुटण्याची चिन्हे दिसत नसल्याने यंदाच्या सिंहस्थासाठी साधुग्रामची नेमकी जागा आणि नेमका शाही मार्ग सांगणे सध्या तरी प्रशासनासाठी अशक्य झाले आहे. रविवारी महंत ग्यानदास यांनी तपोवनातील साधुग्रामसाठी निश्चित केलेल्या जागेची पाहणी केली. सुमारे २५० एकपर्यंत असलेल्या या जागेच्या अधिग्रहणासंदर्भातील स्थितीही त्यांनी प्रशासनाकडून जाणून घेतली. दहा दिवसांत यासंदर्भात कायमस्वरूपी निर्णय होऊ शकेल, असे प्रशासनाकडून त्यांना सांगण्यात आले. पर्यायी साधुग्रामसाठी पंचवटीतील मेरी संस्थेच्या भूखंडाची तसेच मागील सिंहस्थात दुर्घटना घडलेल्या सरदार चौकमार्गे असलेल्या शाही मार्गाऐवजी गणेशवाडीमार्गे असलेल्या पर्यायी मार्गाचीही पाहणी करण्यात आली. पोलिसांच्या वतीने काटय़ा मारुती चौक, पंचवटी कारंजा, इंद्रप्रस्थमार्गे रामकुंड हा एक पर्यायी मार्ग सुचविण्यात आला आहे.
सिंहस्थाला लागणाऱ्या निधीविषयी महंत ग्यानदाल यांनी विचारणा केली असता आ. बाळासाहेब सानप यांनी पैसा कमी पडू दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. केंद्राकडेही प्रस्ताव पाठविण्यात आला असून त्यांचे उत्तर लवकरच येण्याची आशा त्यांनी व्यक्त केली. महंत ग्यानदास यांनी इतर साधू, महंतांशी चर्चा करूनच साधुग्राम आणि पर्यायी शाही मार्गाविषयी निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले. सात ते आठ दिवसांनी पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिक येथे सिंहस्थासंदर्भात बैठक होणार असून त्यात साधुग्राम आणि शाही मार्ग निश्चित होण्याची शक्यता आहे. पाहणी दौऱ्यात जिल्हाधिकारी विलास पाटील, पालिका आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्यासह आ. सानप हेही उपस्थित होते.

Story img Loader