धर्माचार्य, संत-महंत यांचे सहकार्य आणि आशीर्वाद यामुळे केंद्रात भाजप सरकार स्थापन झाले. कुंभमेळ्यात साधू-संतांच्या पावन स्पर्शाने सकारात्मक ऊर्जा तयार होईल आणि देश व राज्यावर काही संकट आल्यास त्याला तोंड देण्याची शक्ती प्राप्त होईल, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केले. कुंभमेळा व्यवस्थापन कौशल्याचे अनोखे उदाहरण आहे. कुंभमेळ्यात धर्माचार्याच्या नेतृत्वाखाली धर्माचा मार्ग प्रशस्त होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिक येथे बुधवारी वैष्णवपंथीय आखाडय़ांचे ध्वजारोहण, साधुग्राम प्रवेशद्वाराचे उद्घाटन तर त्र्यंबकेश्वर येथे गोरक्षनाथ धुनी मंदिराचे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे आदी उपस्थित होते. सिंहस्थ ही हिंदू धर्माची प्राचीन परंपरा आहे. त्याची सुरूवात कधी झाली हे सांगणेही अवघड आहे. कुठलेही निमंत्रण नसताना मोठय़ा संख्येने भाविक त्यात सहभागी होतात. साधू-महंत व शासन यांच्या समन्वयातुन चांगली व्यवस्था केली जाते. सर्वाच्या समन्वय आणि सहकार्यातून यशस्वी होणारा कुंभमेळा जगातील एकमेव शाश्वत उत्सव आहे. व्यवस्थापनशास्त्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यातील व्यवस्थापन कौशल्यावर संशोधन करावे, असेही शहा यांनी नमूद केले.
ध्वजारोहणावेळी हवेत गोळीबार
त्र्यंबकेश्वर येथे आवाहन आखाडय़ाचे ध्वजारोहण झाल्यानंतर एका सदस्याने बारा बोअरच्या बंदुकीतून हवेत गोळीबार केल्यामुळे खळबळ उडाली. ध्वजारोहणाचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी एरवी फटाके फोडले जातात. या आखाडय़ाच्या सदस्याने थेट बंदुकीतून हवेत चार फेरी झाडल्या. महत्वाची बाब म्हणजे, याच दिवशी अन्य कार्यक्रमांनिमित्त भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री त्र्यंबकेश्वरमध्ये उपस्थित होते. उपरोक्त घटनेची तातडीने चौकशी सुरू करण्यात आली असून गुन्हा देखील दाखल केला जाणार असल्याचे पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी सांगितले. सकाळी साडे दहाच्या सुमारास आवाहन आखाडय़ात ध्वजारोहण झाले. आखाडय़ाचा सदस्य असलेला राजेश शिवराणा (बडौदा) सहकुटुंब या कार्यक्रमास उपस्थित होता. ध्वजारोहणानंतर त्याने आपल्या बंदुकीतून हवेत चार फैरी झाडल्या. या बंदुकीचा त्याच्याकडे राष्ट्रीय परवाना आहे. हवेत फैरी झाडल्यावर शिवराणा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Story img Loader