Kunal Kamra Case Mumbai High Court: कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबणात्मक गाण्यामुळे गेल्या महिन्यात मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यानंतर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे) कार्यकर्त्यांनी कुणाल कामराने ज्या स्टुडिओमध्ये कार्यक्रम केला होता त्याची तोडफोड केली होती. याचबरोबर त्याच्या विरुद्ध विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल केले होते.
दरम्यान कुणाल कामराने हे गुन्हे रद्द करण्यात यावे अशी मागणी करत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान कुणाल कामरा याच्या वकिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ते महायुतीत येण्यापूर्वी केलेल्या विधानांचा दाखला दिला. कामराचे वकील म्हणाले “गद्दारांना धडा शिकवला पाहिजे असे अजित पवार म्हटले होते. त्यावेळी त्यांच्यावर कोणताही गुन्हा दाखल झाला नाही. त्यांची कोणी तक्रार केली नाही.”
“याचबरोबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात उद्धव ठाकरे यांनीही शिंदे आणि त्यांच्याबरोर गेलेल्या आमदारांना गद्दार म्हटले होते”, असे कुणाल कामराचे वकील म्हणाले.
दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाला बुधवारी सांगण्यात आले की, मुंबई पोलीस स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याला जीवे मारण्याच्या धमक्या येत असतानाही त्यांची समोरा-समोर चौकशी करण्याचा आग्रह धरत आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या ‘गद्दार’ टिप्पणीबद्दल मुंबई पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध नोंदवलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी करणाऱ्या कामरा याच्या याचिकेवर न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती एस.एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.
कुणाल कामराची अटक टळली
दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवणारे गाणे सादर केल्याप्रकरणी कुणाल कामराला मुंबई उच्च न्यायालयाने अंशतः दिलासा दिला आहे. कुणाल कामराला अटक आवश्यक नाही. तुम्हाला फक्त जबाब नोंदवण्याचा आहे, त्यासाठी त्याला मुंबईत बोलावण्याची गरज आहे का? असा प्रश्न उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने पोलिसांना केला आहे. पण, कुणाल कामराचा जबाब नोंदवण्याच्या मागणीवर मुंबई उच्च न्यायालय सहमत आहे. पण आता दाखल गुन्हा जबाब नोंदवण्यासाठी खार पोलिसांसमोर का चेन्नईला खार पोलीस जाणार हे न्यायालयाच्या अंतिम निकालावर स्पष्ट होणार आहे.
सुनावणी वेळी न्यायालयाने स्पष्ट केले की, कुणाल कामराला अटक आवश्यक नाही. तुम्हाला फक्त जबाब नोंदवण्याचा आहे. कुणाल कामराच्या सुरक्षेची हमी तुम्ही घेणार का? असा सवालच न्यायालयाने पोलिसांना विचारला आहे. तसेच, कामराच्या जीविताला कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होऊ नये याकरिता योग्य काळजी घेण्याची गरज आहे, अशी सूचनाही न्यायालयाने दिली.