Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणावरून सध्या राज्यात जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. अधिवेशनातही या प्रकरणाचे पडसाद उमटल्याचं दिसून आलं. खुद्द मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विधानसभेत सविस्तर निवेदन सादर करत अशा प्रकारच्या गोष्टी सहन करणार नाही, असं स्पष्ट केलं आहे. मात्र, आता कुणाल कामराचा हा शो झालेल्या स्टुडिओच्या चालकांनी तो स्टुडिओच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात सोशल मीडियावर त्यांनी सविस्तर पोस्ट शेअर केली आहे.
का बंद केला स्टुडिओ?
मुंबईच्या खार भागातल्या ‘दी युनिकॉन्टिनेंटल हॉटेल’मध्ये हा ‘दी हॅबिटॅट’चा स्टुडिओ आहे. रविवारी कुणाल कामराचा शो ‘नया भारत’ प्रदर्शित झाल्यानंतर त्यावर संतप्त भावना व्यक्त होऊ लागल्या. शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्टुडिओमध्ये तुफान तोडफोड केली. यात स्टुडिओचं मोठं नुकसान झालं. यामुळे आपल्याला धक्का बसल्याचं स्टुडिओ व्यवस्थापनानं शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
काय आहे स्टुडिओच्या पोस्टमध्ये?
यासंदर्भात हॅबिटॅट स्टुडिओकडून इन्स्टाग्रामवर निवेदन जारी करण्यात आलं आहे. “आम्हाला लक्ष्य करून स्टुडिओमध्ये झालेल्या तोडफोडीमुळे धक्का बसला आहे. काळजी वाटते आहे. आम्ही खचून गेलो आहोत. इथे कलाकार मंडळी जे विचार मांडतात, त्या सर्वांसाठी ते स्वत: पूर्णपणे जबाबदार असतात. त्यांनी सादर केलेल्या कोणत्याही गोष्टीमध्ये आम्ही सहभागी नसतो. पण या सगळ्या घडामोडींमुळे आम्हाला आता पुनर्विचार करण्याची वेळ आली आहे की या प्रत्येक वेळी आम्हाला का लक्ष्य केलं जातं. जणूकाही आम्ही आणि कलाकार एकच आहोत”, असं या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
“जोपर्यंत आम्हाला स्वत:ला व आमच्या मालमत्तेला धोक्यात न टाकता मुक्त अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ कसं उपलब्ध करून देता येईल यासाठी कोणता निश्चित तोडगा सापडत नाही, तोपर्यंत आम्ही स्टुडिओ बंद करत आहोत. आम्ही सर्व संबंधित कलाकार, प्रेक्षक व व्यक्तींना याबाबत खुलेपणाने चर्चा करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. तुमचं मार्गदर्शन मिळावं अशी आम्ही विनंती करतो जेणेकरून आपल्याला कलाकारांच्या अधिकारांचंही रक्षण करता येईल”, असंही या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे.
‘इंडियाज गॉट लेटेंट’च्या भागांचंही झालं होतं चित्रीकरण
‘दी हॅबिटॅट’ याच स्टुडिओमध्ये वादग्रस्त इंडियाज गॉट लेटेंटचे काही भाग चित्रीत झाले होते. त्यावेळीही स्टुडिओला आक्रमक भावनांचा सामना करावा लागला होता. समय रैना व रणवीर अलाहाबादियांच्या प्रकरणात स्टुडिओच्या व्यवस्थापकांचाही जबाब नोंदवण्यात आला होता.
विधानसभेत काय म्हणाले मुख्यमंत्री?
या प्रकरणात कुणाल कामरावर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज विधानसभेत म्हणाले. “त्यांनी माझ्यावर, शिंदेंवर कविता करावी, राजकीय व्यंग करावं. आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण सुपारी घेऊन जर कुणी अपमानित करत असेल, तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. अभिव्यक्ती स्वातंत्र्य वगैरे म्हणत छात्या बडवणाऱ्यांना मी स्पष्टपणे सांगतो, या गोष्टी महाराष्ट्रात आम्ही सहन करणार नाही”, असा उल्लेख फडणवीसांनी आपल्या भाषणात केला.