Kunal Kamra Eknath Shinde Controversy Updates: स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं त्याच्या ‘नया भारत’ या शोमध्ये केलेल्या विधानांवरून सध्या जोरदार राजकीय खडाजंगी पाहायला मिळत आहे. कुणाल कामरानं केलेल्या विडंबनपर गाण्यावरून हा वाद सुरू झाला. एकनाथ शिंदे व त्यांच्यासह शिवसेनेतून बाहेर पडलेल्या गटावर कामरानं शेलक्या शब्दांमध्ये विडंबनपर गाणं म्हटलं. आता एकीकडे त्यावरून राजकीय व कायदेशीर लढा सुरू झाला असताना दुसरीकडे सोशल मीडियावर तुफान मीम्स सुरू झाले आहेत. कुणाल कामराला आलेल्या एका फोन कॉलची कथित ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
कुणाल कामराच्या शोमध्ये एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेबाबत गाणं सादर करण्यात आल्यानंतर त्यावर शिंदे गटाकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. कुणाल कामराचा शो झाला त्या हॅबिटॅट क्लबच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. विधानसभेतही खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कुणाल कामरानं अशा प्रकारे एकनाथ शिंदेंचा अवमान करणं सहन केलं जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली. यावरून वाद सुरू झालेला असतानाच सोशल मीडियावर एका ऑडिओ क्लिपची चर्चा पाहायला मिळत आहे.
काय आहे ऑडिओ क्लिपमध्ये?
सोशल मीडियावर सध्या एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. काँग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या प्रमुख सुप्रिया श्रीनेत यांनीदेखील ही ऑडिओ क्लिप शेअर केली आहे. ही ऑडिओ क्लिप म्हणजे कुणाल कामराला एका शिवसेना कार्यकर्त्याच्या आलेल्या फोनकॉलचं रेकॉर्डिंग असल्याचा दावा केला जात आहे. यातील संभाषणावरूनही विनोदी पोस्ट व्हायरल होत आहेत.
काय आहे कथित संभाषण?
कार्यकर्ता: कुणाल कामरा बात कर रहै है क्या?
कुणाल – हां बोलो..
कार्यकर्ता: तूने CM साहब के बारे में क्या बोला?
कुणाल: कौन सा साहब है ये?
कार्यकर्ता: शिंदे साहब हमारे मुख्यमंत्री उनके बारे में क्या बोला तूने?
कुणाल: मुख्यमंत्री कहाँ, अभी तो उपमुख्यमंत्री है ना..
कार्यकर्ता: हां उनके बारे में क्या व्हिडीओ डाला तूने?
कुणाल: देखा ना व्हिडीओ आपने?
कार्यकर्ता: वो होटल में जा के देख हमने क्या हाल किया, तू जिधर मिलेगा, तेरा भी वहीं हाल करेंगे.. किधर रहता है तू?
कुणाल: आ जा तमिलनाडू..
शिवसैनिक: अभी तमिलनाडू कैसे पहुंचेगा भाई?
सध्या सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप व्हायरल होत असताना त्यावरून तुफान मीम्स नेटिझन्सकडून शेअर केले जात आहेत. ‘तमिलनाडू में कैसे पहुंचेगा भाई’ या वाक्यावरून हे मीम्स केले जात आहेत. काही युजर्सकडून ठाण्यातील रिक्षांचा कुणाल कामराशी सामना होत असल्याचं मीम शेअर केलं आहे.
एका युजरनं अजित पवारांचा जुना व्हिडीओ शेअर करून त्यांच्यावर कारवाई करण्याचं आव्हान एकनाथ शिंदे व त्यांच्या शिवसेनेला दिलं आहे.
दरम्यान, कुणाल कामराने आपली भूमिका मांडण्यासाठी चार पानांचं पत्रच त्याच्या अधिकृत हँडलवर शेअर केलं आहे. आपण काहीही चुकीचं केलेलं नसून माफी मागणार नसल्याचं त्यानं स्पष्ट केलं आहे.