Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी विडंबनात्मक गाणं सादर केलं होतं. यावरून कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते. यानंतर कुणाल कामराविरोधात गुन्हा देखील दाखल झाला. तसेच या प्रकरणी कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आली. मात्र, कुणाल कामराने मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली आणि मद्रास उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश दिले होते.
यानंतर आता कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरविरोधात कुणाल कामराने शनिवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ही एफआयआर रद्द करण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली असल्याती माहिती समोर आली आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
दरम्यान, कुणाल कामराने दाखल केलेल्या या याचिकेत असा दावा करण्यात आला आहे की, ही कारवाई संविधानाच्या अनुच्छेद १९ (१) (अ) (भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार), १९ (१) (जी) (कोणताही व्यवसाय आणि व्यवसाय करण्याचा अधिकार) आणि २१ (जीवन आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार) अंतर्गत हमी दिलेल्या त्यांच्या मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचं याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर आता लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे.
कुणाल कामराला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी आतापर्यंत तीन समन्स बजावले आहेत. मात्र, पोलिसांनी तीन समन्स बजावूनही तो मुंबई पोलिसांसमोर हजर झाला नाही. तसेच मुंबई पोलीस कुणाल कामराच्या चौकशीसाठी त्याच्या मुंबईतील घरी देखील गेले होते. यानंतर कुणाल कामराने एक सूचक पोस्ट शेअर केली होती. “गेल्या १० वर्षांपासून मी जेथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय आहे”, असं कुणाल कामराने म्हटलं होतं.
#Breaking Bombay High Court to consider tomorrow Kunal Kamra's plea seeking quashing of FIR filed against him over his 'Gaddar' jibe allegedly directed at Maharashtra Deputy Chief Minister Eknath Shinde. pic.twitter.com/3Qd7cIEnAl
— Bar and Bench (@barandbench) April 7, 2025
नेमकं प्रकरण काय?
स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.