Kunal Kamra : कॉमेडियन कुणाल कामराच्या गाण्यावरुन वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने हे गाणं दिल तो पागल है मधील भोली सी सुरत या गाण्याच्या चालीवर म्हटलं. एकनाथ शिंदेंचं थेट नाव घेतलं नाही. पण त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे आणि गाणं म्हटलं आहे. थाने की रिक्षा अशी त्या गाण्याची सुरुवात आहे. या सगळ्यावरुन वाद निर्माण झालेला असतानाच संजय राऊत यांनी कुणाल कामराचा व्हिडीओ पोस्ट केला आहे.

नेमकं काय घडलं?

कुणाल कामराने मुंबईच्या खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमध्ये कॉमेडी शो केला. या शोमध्ये एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत हिंदी गाण्यांचं रिमिक्स करून त्यानं गाणी म्हणून दाखवली. यावरून आता मोठा वाद सुरू झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या क्लबची तोडफोड केली. एकीकडे तोडफोड करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असताना दुसरीकडे कुणाल कामराविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्याच्यावर कारवाई होईल असं म्हटलंय.

अजित पवार आणि एकनाथ शिंदेंची माफी मागणार नाही -कामरा

माझा फोन नंबर लिक केला गेला आहे. त्यानंतर मला असंख्य कॉल आले आहेत. आता मी ते व्हॉईस मेलवर फॉरवर्ड केले आहेत. मीडियाला माझं सांगणं आहे की तुम्ही जे काही कव्हर करत आहात आणि बातम्या करत आहात ना त्याआधी एक बाब लक्षात ठेवा की पत्रकारितेच्या स्वातंत्र्याबाबत आपल्या देशाचा क्रमांक १५९ वा आहे. मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कुणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही. असंही कुणाल कामराने म्हटलं आहे.

संजय राऊत यांची पोस्ट काय?

या सगळ्यानंतर आता संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे. ज्यामध्ये कुणाल कामरा एक गाणं म्हणतो आहे. तसंच संजय राऊत म्हणतात ये तो अपुन के जैसा निकला, झुकेगा नहीं साला! जय महाराष्ट्र! अशा ओळी लिहित हे गाणं पोस्ट केलं आहे. ज्याची चर्चा आता सोशल मीडियावर होते आहे.

खासदार संजय राऊत यांनी ही पोस्ट केली आहे. तसंच आज संजय राऊत यांना विचारणा करण्यात आली की तुमचे त्याच्यासह फोटो आहेत, त्यावर ते म्हणाले मी ही बाब कधीही नाकारली नाही. कुणाल कामरासह माझे फोटो आहेत मी त्याच्या कार्यक्रमांना जात असतो. पण मग एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे लोक आणि भाजपाचे लोकही कुणाल कामराला भेटतात ते फोटो का समोर आले नाहीत? असा सवाल केला होता. आता त्यांनी व्हिडीओ पोस्ट करत पुन्हा एकदा कुणाल कामराची पाठराखणच केली आहे.