Kunal Kamra कॉमेडियन कुणाल कामराने एकनाथ शिंदेंचं विडंबन करणारं गाणं म्हटलं आहे आणि कॉमेडी शोमध्ये त्यांचा उल्लेख गद्दार असा केला आहे. ज्यावरुन चांगलाच वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराने ज्या स्टुडिओत हे गाणं म्हटलं आणि शो सादर केला त्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली आहे. तसंच कुणाल कामराविरोधात पोलिसात तक्रारही करण्यात आली आहे. या घटनेचे पडसाद आता राज्यभरात उमटत आहेत. दरम्यान शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी कुणाल कामराने ( Kunal Kamra ) माफी मागावी अन्य़था त्याला शोधू आणि उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

कुणाल कामरा मातोश्रीवर लपला असेल-संजय निरुपम

अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा कुणाल कामराने ( Kunal Kamra ) कायमच दुरुपयोग केला आहे. जे शिवसैनिक संतापले आहेत ते आपल्या परिने उत्तर देतील. मात्र कुणाल कामरा ( Kunal Kamra ) पळून गेला आहे किंवा मातोश्रीवर लपून बसला असेल, त्याच्या विरोधात आम्ही उत्तर द्यायचं आहे ते देऊ असं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. कुणाल कामरा जाणीवपूर्वक कुणाला गद्दार म्हणत असेल तर त्याला माफ करणार नाही. फ्रिडम ऑफ स्पीच आम्हाला माहीत आहे. संविधानात त्याची तरतूद आहे. फ्रिडम ऑफ स्पीच म्हणजे कुणावरही कशीही टिपण्णी करत असाल तर संविधानाने आम्हालाही अधिकार दिला आहे. कुणाल कामराने फ्रिडम ऑफ स्पीचचा दुरुपयोग केला आहे.

कुणाल कामरा पाच ते सहा वर्षांपूर्वीही मुंबई सोडून पळाला होता

पाच ते सहा वर्षांपूर्वी कुणाल कामरा ( Kunal Kamra ) जेव्हा मुंबईत वास्तव्य करत होते तेव्हा मदर टेरेसा, शीख बांधव, ख्रिश्चन बांधव यांच्याबाबत कॉमेडी शोमध्ये विचित्र काही गोष्टी बोलत होते. त्यावेळी त्यांच्याविरोधात जी कारवाई झाली त्यानंतर कुणाल कामरा इथून पळून गेले. सध्या बहुदा ते गुडगांव मध्ये वास्तव्य करतात. आम्ही तिथे शोधूनही त्यांचा कार्यक्रम करु शकतो. एकनाथ शिंदेंची माफी कुणाल कामराने मागितली पाहिजे. तसंच अशा प्रकारच्या खालच्या पातळीवरची टीका कुठल्याही नेत्यावर करु नये अशीही मागणी संजय निरुपम यांनी केली आहे.

..तर कुणाल कामराला आम्ही शोधून त्याचा बदला घेऊ-निरुपम

अशा प्रकारे सोशल मीडियाचा दुरपयोग कुणी करत असेल त्याचं सोशल मीडियावरचं खातं बंद झालं पाहिजे अशीही मागणी आम्ही करणार आहोत. नाराज झालेल्या शिवसैनिकांनी स्टुडिओ फोडला, मी त्याचं समर्थन करतो. कारण भावना व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाकडे आहे. जर कुणी आमच्या नेत्याला शिव्या देऊ शकतो आणि फ्रिडम स्पीच म्हणू शकतो. ही कारवाई आम्हाला कुणाल कामराच्या ( Kunal Kamra ) विरोधातच करायची होती पण तो बहुदा मातोश्रीवर लपला आहे. कारण मुंबईत तेवढी एकच सेफ जागा त्याच्यासाठी आहे. तसं नसेल तर कदाचित काही वर्षांपूर्वी पळाला तसा तो आता मुंबई सोडून पळून गेला असेल. गुडगावमध्ये असेल तर तिथूनही त्याला शोधू आणि बदला घेऊ. असाही इशारा संजय निरुपम यांनी दिला आहे.