Kunal Kamra प्रसिद्ध कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचलं. त्या गाण्यात त्याने एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं नव्हतं. मात्र गद्दार असा उल्लेख त्याच्या गाण्यात होता. तसंच जे वर्णन केलं होतं ते एकनाथ शिंदेंचं होतं. त्यावरुन शिवसैनिक आक्रमक झाले. यावरुन चांगलंच राजकारण रंगलं. आता कुणाल कामराची नवी पोस्ट चर्चेत आली आहे.
कुणाल कामराच्या गाण्यानंतर काय घडलं?
कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर विडंबनात्मक गाणं रचल्यानंतर कुणाल कामराने ज्या हॉटेलमध्ये हा शो केला तिथे तोडफोड करण्यात आली. त्यानंतर कुणाल कामराच्या विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कुणाल कामराने केलेलं वक्तव्य योग्य नाही असं म्हणत कारवाईचा इशारा दिला. अधिवेशनातही कुणाल कामराचा विषय गाजला. दरम्यान ठाकरे गटाने कुणाल कामराला अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही का? असा सवाल करत कुणाल कामराला पाठिंबाच दर्शवला. तर त्यावरुनही सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामना पाहण्यास मिळाला. कुणाल कामराला पोलिसांनी दोनदा समन्स बजावलं. मात्र कुणाल कामरा चौकशीसाठी हजर राहिला नाही. आता कुणाल कामराने एक पोस्ट लिहिली आहे. लोकशाही पद्धतीने कलाकाराची हत्या कशी करायची याबाबत ही पोस्ट आहे.
काय आहे कुणाल कामराची पोस्ट?
लोकशाही पद्धतीने एखाद्या कलाकाराची क्रमा-क्रमाने कशी हत्या करायची ?
१) संताप अशा पद्धतीने आणि इतका प्रचंड व्यक्त करायचा की तो अनेक ब्रांड्सना काम करताना अडचण झाली पाहिजे.
२) त्यानंतर संताप आणि निषेधाचं प्रमाण आणखी वाढवायचं जेणेकरुन संस्थात्मक किंवा व्यक्तीगत कार्यक्रम करण्याआधी कलाकाराला दहादा विचार करावा लागेल.
३) संतापाचं आणि निषेधाचं, आरडा ओरडा करण्याचं प्रमाण इतकं वाढवा की मोठी हॉटेल्स, स्टुडिओ तुमचा कार्यक्रम घेण्याची रिस्क घ्यायला नको.
४) संतापाला आता हिंसेचं रुप द्या, म्हणजे छोट्या छोट्या जागा, स्टुडिओ हेदेखील दहशतीने त्यांची दारं बंद करतील.
५) स्टँड अप कॉमेडीसाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांना समन्स धाडा, असं केल्याने कलाकाराचा मंच हा एखादा क्राईम सीन होऊन जाईल.
हे सगळं केलं की कलाकाराकडे फक्त दोन पर्याय उरतात. पहिला पर्याय म्हणजे आपला आत्मा विकायचा आणि त्यांच्या हातचं बाहुलं व्हायचं किंवा दुसरा पर्याय शांत बसायचं. मी सांगतोय हे एखादं प्लेबुक नाही. तर राजकीय हत्यार आहे ज्यामुळे कलाकाराची लोकशाही पद्धतीने पद्धतशीर हत्या करता येते.
अशी पोस्ट कुणाल कामराने लिहिली आहे. आता या पोस्टवरुन काय पडसाद उमटणार हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. कुणाल कामराने सगळ्या प्रकरणावरुन मद्रास उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्याला न्यायालयाने दिलासा दिला होता. दरम्यान कुणाल कामराने जो वाद झाला त्यावरुन माफी मागणार नाही अशी भूमिका आधीच घेतली आहे. त्यासंदर्भातली त्याची पोस्टही व्हायरल झाली आहे