Kunal Kamra कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली. त्यांच्या विरोधात एक गाणं त्याने स्टँड अप कॉमेडी शोमध्ये गायलं. ज्यानंतर मुंबई तो ज्या स्टुडिओत आला होता त्या स्टुडिओची शिवसैनिकांनी तोडफोड केली. आज अधिवेशनातही हा मुद्दा गाजला. अंबादास दानवेंनी मांडलेल्या मुद्द्याला उदय सामंत यांनी उत्तर दिलं.
काय म्हणाले अंबादास दानवे?
“सभापती महोदय, मुंबईत एक घटना घडली. पोलीस अधिकारी उपस्थित असताना स्टुडिओवर काही लोकांनी हल्ला केला. मंगळवार आणि बुधवारी आपण संविधानावर चर्चा करणार आहोत. चर्चा करताना मुलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्यं. असं असताना कुणाल कामराने विडंबन कविता सादर केली. कॉमेडियन अशा गोष्टी सादर करत असतात. अशात सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. या कार्यकर्त्यांनी सोलापूरकर, कोरटकर यांच्यावर काही भाष्य केलं नाही.” असं अंबादास दानवे यांनी म्हणताच सभागृहात गदारोळ सुरु झाला. दानवे पुढे म्हणाले म्हणाले, “छत्रपती शिवरायांचा अपमान करणारे लोक कोरटकर आणि सोलापूरकर आहेत. तरीही एका कॉमेडियनचा निषेध नोंदवला जातो, पोलिसांच्या उपस्थिती तोडफोड झाली.
कॉमेडियनने माफी मागितली पाहिजे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा अधिकार हिरावणं-दानवे
राज्याचे मुख्यमंत्री म्हणतात कॉमेडियनने माफी मागितली पाहिजे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार सरकार हिरावून घेतं आहे का? राज्याचे मुख्यमंत्र्यांनी गुन्हेगारांवर कारवाई केली पाहिजे. अशा पद्धतीने सत्ताधारी पक्षाचेच लोक तोडफोड करतात. कोरटकर, सोलापूरकर बाबत हे शांत का बसले आहेत? मला वाटतं कायदा आणि सुव्यवस्था सत्ताधारी पक्ष बिघडवत आहेत. तोडफोड करणाऱ्या सगळ्यांनाच अटक झाली पाहिजे. अशी मागणी अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
उदय सामंत यांनी काय उत्तर दिलं?
विरोधी पक्षनेत्यांनी जो मुद्दा मांडला तो मांडून विषयाला भलतीकडेच नेण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. ज्या व्यक्तीचं समर्थन करत आहेत ती व्यक्ती कशी आहे? याचं ब्रिफिंग घ्यायला हवं होतं. पण आदेश आल्यामुळे, सांगितलं गेल्यामुळे विरोधी पक्षनेते असं बोलत असतील. विरोधी पक्षनेत्यांबाबत आमचं काही म्हणणं नाही. पण त्यांच्यावर दबाव असल्याने हे बोलत आहेत. कुणाल कामरा राहुल गांधींबरोबर भारत जोडो यात्रेत होता. तसंच एकनाथ शिंदेंपुरता हा विषय मर्यादित नाही. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत जी काही वाक्य बोलली आहेत ती इथे सांगण्यासारखी नाहीत. मराठी भाषेचा मंत्री मी इथे आहे. अशा गोष्टींचं समर्थन कुणी करु नये. एकनाथ शिंदे यांचा सत्कार महाराष्ट्राची संस्कृती जपली म्हणून वारकरी बांधवांनी केला होता त्यांच्याबाबत कुणाल कामरा बोलला आहे, आनंद महिंद्रा, मुकेश अंबांनींबाबत बोलला आहे. आपण त्याचं समर्थन करता कामा नये. असं उदय सामंत म्हणाले.
लगेच पाठिंबा कसा मिळतो?
कुणाल कामराचा व्हिडीओ आल्यानंतर ३४ मिनिटांत एक ट्वीट येतं आणि ते कुणाल कामराचं समर्थन करणारं असतं. नंतर लगेच दुसरं ट्वीट येतं. आमची मागणी आहे की त्याचा बोलविता धनी कोण? ते शोधलं गेलं पाहिजे. तुमच्या नेत्यांबाबत काही घडलं तर आम्ही तुमच्या मागे उभे राहू. एकनाथ शिंदेंवर टीका करायची, राजकारण करायचं हे काही लोकांनी ठरवून सुरु केलं आहे. ज्या पद्धतीने बोललं गेलं ती विकृती आहे ती विकृती आपण ठेचली पाहिजे. भारत जोडो यात्रेतून हा माणूस फिरतो त्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? भविष्यात कुणाच्याही बाबतीत असे वाद व्हायला नको हे करणं आवश्यक आहे. राजकारणातही माणुसकी असते याचा विचार केला पाहिजे. आज जे आमच्यावर आलं आहे ते भविष्यात तुमच्यावरही येऊ शकतं, असं उदय सामंत म्हणाले. तसंच हे असं संकट तुमच्यावर आल्यास आम्ही तुमच्यासह उभे राहू. असंही उदय सामंत यांनी म्हटलं. कुणाल कामराच्या मुद्द्यावरुन सभागृहात गदारोळ वाढल्यानंतर १० ते १५ मिनिटांसाठी सभागृह तहकूब करण्यात आलं.