Kunal Kamra Next Show Venue Decided : प्रसिद्ध स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची थट्टा करणारं एक गाणं सादर केलं आहे. या गाण्याचा व्हिडीओ देखील त्याने समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. या गाण्यामुळे दोन दिवसांपासून बराच वाद चालू आहे. कुणाल कामरा याने ज्या ठिकाणी ते गाणं म्हटलं आणि शो केला त्या युनीकॉन्टिनेंटल हॉटेलची, तिथल्या ‘दी हॅबिटॅट’ या स्टुडिओची शिवसेना (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. कुणाल कामराचं वर्तन योग्य नाही असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा याने देखील प्रतिक्रिया दिली आहे. ‘माय स्टेटमेंट’ असं कॅप्शन देत त्याने एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये कुणाल कामराने म्हटलं आहे की “ज्या ठिकाणी माझा शो आयोजित करण्यात आला होता, ती अशा प्रकारच्या कार्यक्रमांसाठीची जागा आहे.

माफी मागण्यास कुणाल कामराचा नकार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रसारमाध्यमांसमोर म्हणाले होते की कुणाल कामरा याने एकनाथ शिंदे यांची माफी मागायला हवी. त्यावर कुणाल म्हणाला, मी एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची माफी मागणार नाही. मी कोणालाही घाबरत नाही. मी माझ्या पलंगाखाली लपून बसलेलो नाही.

कुणालने त्याच्या पुढच्या कार्यक्रमासाठी नवी जागा निवडली आहे

कुणाल कामराने ज्या ठिकाणी त्याचा कार्यक्रम घेतला होता त्या ‘दी हॅबिटॅट’ स्टुडिओची शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. त्यावर मिश्किल टिप्पणी करताना कुणालने म्हटलं आहे की मी आता मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिजवर (प्रभादेवी) पुढचा शो आयोजित करणार आहे. तो म्हणाला, “माझ्या पुढच्या कार्यक्रमाचं ठिकाण असं असेल जे पाडण्याची अधिक गरज आहे. मी एल्फिन्स्टन ब्रिज किंवा मुंबईतील अशा इमारतीची निवड करेन जी पाडण्याची गरज आहे.” कुणालने उपहासाने हे वक्तव्य केलं आहे.

मुंबईतील एल्फिन्स्टन ब्रिज १० एप्रिलपासून बंद केला जाणार आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) हा १२५ वर्षे जुना पूल लवकरच पाडणार आहे. त्याजागी शिवडी-वरळी एलिव्हेटेड कनेक्टर प्रकल्प उभारण्याची एमएमआरडीएची योजना आहे. एल्फिन्स्टन पूल पाडून तिथे डबल डेकर पूल उभारला जाणार आहे.