Kunal Kamra Eknath Shinde Controversy : स्टॅण्डअप कॉमेडियन कुणाल कामराने काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाणं सादर केल्याप्रकरणी तो चांगलाच वादात सापडला आहे. या प्रकरणी कुणाल कामराच्या विरोधात शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. तसेच या प्रकरणात कुणाल कामराच्याविरोधात गुन्हा देखील झालेला आहे.

या प्रकरणात कुणाल कामराला अटक करण्याची मागणी शिवसेनेच्या नेत्यांकडून केली जात आहे. मात्र, मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला अटकपूर्व जामीन मंजूर करत ७ एप्रिलपर्यंत अटकेपासून संरक्षण दिलं होतं. आज अटकेपासून संरक्षणाची ही मुदत संपली होती. यानंतर आता मद्रास उच्च न्यायालयाने कुणाल कामराला पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे.

कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाने दिलेला अंतरिम अटकपूर्व जामीन आता १७ एप्रिलपर्यंत वाढवला आहे. या संदर्भातील वृत्त एएनआयने दिलं आहे. दरम्यान, दुसरीकडे कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात देखील धाव घेतली असून मुंबई पोलिसांनी दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे. कुणाल कामराने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआर रद्द करण्याच्या याचिकेवर लवकरच सुनावणी होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देणार? याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्टॅण्डअप कॉमेडिअन कुणाल कामराने आपल्या शोमध्ये राज्यातील राजकीय परिस्थितीवर भाष्य करत टीका केली होती. यामध्ये कुणाल कामराने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीचा संदर्भ दिला होता. यामध्ये कुणाल कामरा शोमध्ये म्हटलं होतं की, “महाराष्ट्राच्या निवडणुकीत त्यांनी काय केलं आहे, त्यांना सांगावं लागेल. आधी शिवसेना भाजपामधून बाहेर पडली, नंतर शिवसेना शिवसेनेतून बाहेर पडली. राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादीतून बाहेर पडली”, असं म्हणत कुणाल कामराने शोमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत एक व्यंगात्मक गाणंही सादर केलं होतं. मात्र, व्यंगात्मक गाणं सादर केल्यानंतर शिवसेनेच्या (शिंदे) कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील कार्यक्रमस्थळाच्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसेच कुणाल कामराच्या विरोधात तक्रारही दाखल केली होती.